काँग्रेस माजी जिल्हा उपाध्यक्षांच्या मुलांवर रेती तस्करीचा गुन्हा दाखल

दोन ट्रॅक्टर, जेसीबीसह 30.20 लाखांचा मुद्देमाल जप्त

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
गोंडपिपरी,
sand smuggling काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष देवेंद्र बट्टे यांची मुले रितेश देवेंद्र बट्टे व लोकश देवेंद्र बट्टे यांच्यासह सहा जणांविरूध्द गोंडपिपरी पोलिसांनी रेती तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन ट्रॅक्टर व जेसीबीसह एकूण 30 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली.
 

sand smuggling  
तालुक्यातील तारडा ते कुलथा गावाकडे जाणार्‍या मार्गालगत असलेल्या संतोष देवाडे यांचे शेतशिवारातील खुल्या जागेत अवैधरित्या साठवणूक करून ठेवलेल्या रेतीचे जेसीबीच्या सहाय्याने दोन ट्रॅक्टरमध्ये रेती भरून वाहतुक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी धाड टाकली. यावेळी प्रत्येकी 1 ब्रास रेती भरलेले दोन वीना क्रमांकाचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरमध्ये रेती भरण्याकरीता वापरलेली विना नंबरचे जेसीबी यंत्र आढळून आले. या कारवाईत पोलिसांनी 10 हजार रुपये किंमतीची रेती, 5 लाख रुपये किंमतींच्या ट्रॅक्टरसह ट्रॉली तसेच 20 लाख रुपये किंमतीचे जेसीबी यंत्र असा एकूण 30 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी घटनास्थळावरून हस्तगत केला.
 
 
या प्रकरणी आरोपी आशिक नरेश मडावी (19, रा. व्यंकटपूर, ता. गोंडपिपरी, जि. चंद्रपूर), ट्रॅक्टर मालक रितेश देवेंद्र बट्टे (30, रा. गोंडपिपरी), ट्रॅक्टर चालक प्रज्वल विश्वनाथ कोहपरे (19, रा. वढोली ता. गोंडपिपरी), ट्रॅक्टर मालक हेमंत बंडु निखाडे (28, रा. फुरडीहेटी, ता. गोंडपिपरी), जेसीबी चालक सचिन सुरेश चापले (22, रा. कवठी, ता. कवठाला, जि. आसिफाबाद, तेलंगाना), जेसीबी मालक लोकश देवेंद्र बट्टे (20, रा. गोंडपिपरी) यांना ताब्यात घेवून त्यांच्याविरूद्ध कलम 303 (2), 3 (5) भान्यास. अन्वये गुन्हा नोंद केला आहे.
ही करवाई जिल्हा पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यजीत आमले यांच्या मार्गदर्शनात गोंडपिपरी पोलिस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे, पोलिस उप निरीक्षक वसंत कोसमशिले आदींनी केली.