बँकॉकहून ४.७१ कोटींचे गांजा तस्करीचा प्रयत्न

- नागपूरचा युवक मुंबई विमानतळावर अटकेत

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर
crime news nagpur बँकॉकहून मुंबईत आलेल्या नागपूरच्या एका ३० वर्षीय युवकाला ४.७१ कोटी रुपये किमतीचा १३.४७ किलो हायड्रोपोनिक गांजा भारतात तस्करी करून आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाच्या एअर इंटेलिजन्स युनिट (एआययू) ने अटक केली आहे.
 

crime news nagpur youth arrested at mumbai airport for smuggling rs 4.71 crore hydroponic ganja from bangkok 
प्राप्त माहितीनुसार, विकास गणोरकर हा मंगळवारी बँकॉकहून मुंबई विमानतळावर दाखल झाला होता. त्याच्याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एआययूच्या पथकाने त्याला ताब्यात घेऊन त्याच्या ट्रॉली बॅगेची तपासणी केली. तपासणीदरम्यान बॅगेत १४ प्लास्टिक पॅकेटमध्ये भरलेला १३ हजार ४७७ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. या अमली पदार्थातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने अधिकाऱ्यांनी तो अंमली पदार्थ प्रतिबंधक कायदा (एनडीपीएस) अंतर्गत जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची आंतरराष्ट्रीय काळ्या बाजारातील किंमत सुमारे ४ कोटी ७१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय तपासासाठी आरोपीची ट्रॉली बॅग, पासपोर्ट, बोर्डिंग पास, बॅगेज टॅग आणि मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणामागील मोठे अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट, तसेच हा माल कोणाकडे पोहोचविण्यात येणार होता, याचा तपास अधिकारी करीत आहेत.