सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर दिल्ली हायकोर्टाची चिंता

‘प्रत्येक नागरिकाचे आयुष्य अनमोल’ म्हणत वैद्यकीय देखरेखीचे दिले निर्देश

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली
delhi high court कॉकरोच जनता पक्षाच्या जंतर-मंतर येथील आंदोलनात पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांचे उपोषण सलग 19व्या दिवशी सुरू आहे. मात्र, एवढ्या दीर्घकाळ चाललेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्याने देशभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियावर त्यांच्या प्रकृतीशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल होत असून, या उपोषणामुळे त्यांच्या वजनात 9 किलोने घट झाल्याची माहिती समोर आली आहे.
 

delhi high court raises concern over sonam wangchuk health during hunger strike 
सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावे, यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणी यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली असून सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यांची दररोज वैद्यकीय तपासणी केली जात असून, आवश्यक वैद्यकीय माहिती त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना दिली जात आहे.
यावर दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सरकारी डॉक्टरांकडून सोनम वांगचुक यांची नियमित तपासणी केली जावी. तसेच डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक वाटल्यास तातडीने योग्य वैद्यकीय हस्तक्षेप करण्यात यावा. “प्रत्येक नागरिकाचे आयुष्य अनमोल आहे आणि ते वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न झाले पाहिजेत,” असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सॉलिसिटर जनरल यांनीही न्यायालयाच्या भूमिकेशी सहमती दर्शवत प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक ती सर्व मदत सरकारकडून करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी न्यायालयाला दिले. सरकारने सरकारी डॉक्टर आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवत असल्याचेही न्यायालयाला सांगितले.जनहित याचिकेत सोनम वांगचुक यांच्या सतत खालावत चाललेल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यावर सरकारने परिस्थितीनुसार आवश्यक ती सर्व वैद्यकीय पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले. सरकारच्या या भूमिकेची दखल घेत न्यायालयाने समाधान व्यक्त केले आणि डॉक्टरांच्या वैद्यकीय मतानुसार योग्य वेळी उपचार व हस्तक्षेप करण्याचे निर्देश देत सुनावणी पूर्ण केली.
 
 
उद्दिष्ट पूर्ण होईल का?
दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयात delhi high court सुनावणी होण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी आपल्या समर्थकांना संबोधित केले होते. त्यावेळी त्यांनी उपोषण सोडण्याबाबत प्रश्न उपस्थित केला. “मी उपोषण सोडल्याने काय बदलणार आहे? मी जेवण केल्याने आंदोलनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल का?” असा सवाल त्यांनी केला. मात्र, त्यांची तब्येत खालावत असल्याने समर्थकांची चिंता वाढली आहे. अनेक राजकीय नेत्यांनीही त्यांना प्रकृतीची काळजी घेण्याचे आवाहन करत उपोषण सोडण्याची विनंती केली आहे.
एका व्हिडिओमध्ये सोनम वांगचुक यांनी, “माझी तब्येत इतकी गंभीर झालेली नाही की येत्या काही दिवसांत मृत्यू होईल,” असे म्हटले आहे. तसेच, मेडिकल रिपोर्टनुसार चिंता करण्याचे कारण नसल्याचे सांगत आपण आणखी काही दिवस उपोषण करू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.याचदरम्यान कॉकरोच जनता पक्षाने गुरुवारी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरात चिंता व्यक्त केली जात असून, पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.