चेन्नई,
Dhoni best for CSK coach इंडियन प्रीमियर लीगमधील (आयपीएल) सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्ससमोर आता नव्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. स्टीफन फ्लेमिंग आणि फ्रँचायझीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतल्यानंतर या पदासाठी चर्चा सुरू झाली असून, भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने यावर महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे.ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना अश्विनने म्हटले की, स्टीफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंग धोनी यांची क्रिकेटविषयक विचारसरणी एकमेकांना पूरक होती. फ्लेमिंगला धोनीच्या निर्णयक्षमतेवर पूर्ण विश्वास होता, तर धोनीलाही फ्लेमिंग संघासाठी किती महत्त्वाचा आहे याची जाणीव होती. त्यामुळे ही भागीदारी अनेक वर्षे यशस्वी ठरली. मात्र, आता चेन्नई सुपर किंग्सने नव्या पर्वाची सुरुवात करण्याची गरज असल्याचे त्याने सांगितले.

अश्विनच्या मते, महेंद्रसिंग धोनी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार असेल, तर त्याच्यापेक्षा योग्य उमेदवार सीएसकेला मिळू शकत नाही. मात्र, धोनीने ही भूमिका स्वीकारली नाही, तर संघाने असा प्रशिक्षक निवडावा जो स्वतंत्रपणे निर्णय घेऊ शकेल आणि त्यांची जबाबदारीही स्वीकारेल.नवीन मुख्य प्रशिक्षकासाठी सुरुवातीचा काळ सोपा नसेल, असेही अश्विनने स्पष्ट केले. त्याच्या मते, महेंद्रसिंग धोनी आजही संघातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहे. संघ निवडीसह अनेक महत्त्वाच्या निर्णयांमध्ये त्याचे मत निर्णायक ठरत असल्याने नव्या प्रशिक्षकाला त्या परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागेल.
स्टीफन फ्लेमिंग २००८ मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात खेळाडू म्हणून चेन्नई सुपर किंग्समध्ये दाखल झाला होता. त्यानंतर २००९ मध्ये त्याने मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारली. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने पाच आयपीएल विजेतेपदे आणि दोन चॅम्पियन्स लीग टी-२० स्पर्धांची विजेतेपदे पटकावली. तसेच संघाने विक्रमी १२ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला, तर १० वेळा आयपीएलच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले. फ्लेमिंगच्या यशस्वी कारकिर्दीनंतर आता सीएसकेचा पुढील मुख्य प्रशिक्षक कोण ठरणार, याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागले आहे.