ढोंगी बाबांच्या पोलखोलपासून थरारक क्लायमॅक्सपर्यंत

‘ईशा’ने जिंकली प्रेक्षकांची पसंती

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
मुंबई
eesha ott ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला नवनवीन चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. ‘धुरंधर 2’ ते ‘इक्का’पर्यंत अनेक चित्रपटांना ओटीटीवर प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला आहे. अशाच चित्रपटांमध्ये सस्पेन्स आणि हॉररचा संगम असलेला ‘ईशा’ हा चित्रपट विशेष चर्चेत आहे. रंजक कथानक, अनपेक्षित वळणं, प्रभावी अभिनय आणि दमदार क्लायमॅक्स यामुळे हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. विशेष म्हणजे, आयएमडीबीवरही या चित्रपटाला दहापैकी 7.2 इतके चांगले रेटिंग मिळाले आहे.
 

eesha ott movie review | suspense horror thriller with shocking climax 
या चित्रपटाची कथा बालपणीच्या चार मित्रांपासून सुरू होते. त्यांच्यातील एक मुलगी आपल्या शेजारी राहणाऱ्या एका मुलीने आत्महत्या केल्याची आणि तिचा आत्मा आजही भटकत असल्याची गोष्ट सांगते. मात्र तिचे इतर मित्र या दाव्यावर विश्वास ठेवत नाहीत आणि आत्म्यासारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वात नसल्याचे सांगतात. कालांतराने हे चारही मित्र मोठे होतात. त्यानंतर त्यांच्यापैकी एका मुलीच्या घरी काम करणाऱ्या महिलेच्या लहान मुलीसोबत धक्कादायक घटना घडते. तिच्यामध्ये दुसऱ्या आत्म्याने प्रवेश केल्याचा दावा करत तिच्यावर अमानुष मारहाण केली जाते आणि त्यातच तिचा मृत्यू होतो. ही घटना पाहिल्यानंतर ती मुलगी आणि तिचे तीन मित्र मिळून ढोंगी बाबांचा पर्दाफाश करण्याचा निर्धार करतात.
या प्रवासात ते अनेक तथाकथित बाबांचे खरे चेहरे समाजासमोर आणतात. मात्र एका टप्प्यावर त्या मुलीला इंटरनेटवर अशा एका न्युरोलिस्टबद्दल माहिती मिळते, ज्याने सर्व काही सोडून बाबा बनण्याचा निर्णय घेतला असून तो आत्म्यांपासून लोकांची सुटका करण्याचे काम करत असतो. सुरुवातीला हे चारही मित्र त्यालाही ढोंगी समजून त्याची पोलखोल करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र कथेला पुढे एक अनपेक्षित कलाटणी मिळते आणि शेवटी असा ट्विस्ट समोर येतो, ज्याची प्रेक्षकांनी कल्पनाही केलेली नसते. याच थरारक सस्पेन्समुळे ‘ईशा’ प्रेक्षकांसाठी वेगळा अनुभव ठरतो.
2025 मध्ये प्रदर्शित झालेला ‘ईशा’ हा तेलुगू ड्रामा हॉरर थ्रिलर चित्रपट आहे. या चित्रपटाची कथा श्रीनिवास यांनी लिहिली असून सध्या तो जिओ हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटाने यश मिळवले होते. चित्रपटात त्रिगुण, हेबाह पटेल, अखिल राज, सिरी हंमंथ, बबलू पृथ्वीराज आणि मिमे मधु यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. प्रभावी कथा, थरारक मांडणी आणि अनपेक्षित शेवटामुळे ‘ईशा’ हा हॉरर-सस्पेन्स चित्रपटप्रेमींसाठी पाहण्यासारखा चित्रपट ठरत आहे.