मुंबई
el nino राज्यातील विविध जिल्ह्यांवर ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामाचे सावट निर्माण झाले असून बदलते हवामान, पावसातील अनियमितता आणि शेतीवरील संभाव्य परिणामामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. एल निनोच्या प्रभावामुळे पिकांचे नुकसान, पेरणीवर परिणाम आणि उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भात पाऊस कधी बरसणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या भागात जुलै महिन्याच्या अखेरीस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात पावसाच्या कमतरतेमुळे खरीप हंगामातील पिके संकटात आली आहेत. अनेक भागांत पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भाष्य करताना सांगितले की, राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला आहे, तर काही भागांत अपेक्षेइतका पाऊस झालेला नाही. विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे.
पाऊस कमी असला तरी राज्यात आतापर्यंत जवळपास 70 टक्के खरीप पेरणी पूर्ण झाली असून उर्वरित 30 टक्के पेरणी अद्याप बाकी आहे. काही ठिकाणी पाऊस झाल्यामुळे जमिनीत वाफसा नसल्याने पेरणी रखडली आहे, तर काही भागांत जमीन पुरेशी ओली नसल्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करता आलेली नाही. पावसाअभावी काही ठिकाणी पेरलेले बियाणेही उगवले नसल्याचे भरणे यांनी सांगितले.
सामना करावा लागणार
राज्य सरकारचे खरीप पेरणीचे उद्दिष्ट el nino जुलैअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मात्र, हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रावर एल निनोचे संकट कायम असून त्याचा सामना करावा लागणार असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले. विदर्भ आणि मराठवाड्यातील ज्या भागांत अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही, त्या भागांत जुलैअखेरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज असल्याची माहिती त्यांनी दिली.राज्यात सर्वाधिक खरीप पेरणी अमरावती विभागात झाली असून तेथे 86 ते 90 टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. तर सर्वात कमी पेरणी ठाणे विभागात झाल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले. कोकण विभागात सर्वाधिक पाऊस झाला असून नागपूर विभागात सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील नंदूरबार, शहादा, तळोदा आणि अक्राणी या चार तालुक्यांत सर्वात कमी पाऊस झाल्याचेही त्यांनी नमूद केले.
यंदा शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर पेरणी केली आहे. मात्र, काही भागांत बियाणे उगवले नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला असून या समस्येचा परिणाम राज्यातील 10 जिल्ह्यांवर झाला असल्याची माहिती दत्तात्रय भरणे यांनी दिली. आता जुलैअखेर होणाऱ्या पावसावर खरीप हंगामाचे भवितव्य अवलंबून असून शेतकऱ्यांना समाधानकारक पावसाची प्रतीक्षा आहे.