आसाम
smuggling case भिकारी म्हणून वावरत सर्वांच्या नजरेत धूळफेक करणाऱ्या एका व्यक्तीचा मोठा तस्करीचा डाव आसाम पोलिसांनी उधळून लावला आहे. या व्यक्तीने आसाममध्ये एक घर खरेदी करून त्यात मोठ्या प्रमाणावर सोने लपवून ठेवले होते. पोलिसांनी घरावर छापा टाकल्यानंतर तेथे सोन्याचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत प्रचंड प्रमाणात सोने आणि चांदी जप्त करण्यात आली असून संबंधित व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन समोर आले आहे.
आसाम पोलिसांनी गुवाहाटी येथील या व्यक्तीच्या घरावर कारवाई केली असता तब्बल 37.064 किलो सोन्याचा साठा सापडला. या सोन्याची बाजारातील किंमत सुमारे 54 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पूर्वोत्तर भारतात एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने जप्त होण्याची ही ऐतिहासिक कारवाई मानली जात आहे. आरोपीचे नाव अक्षय परशुराम बनसोडे असून तो महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
घरात सापडला सोन्याचा मोठा साठा
गुवाहाटी पोलीस कमिश्नरेटच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि लतासिल पोलीस ठाण्याने संयुक्तपणे गुवाहाटीतील खारघुली परिसरातील एका घरावर छापा टाकला. या कारवाईत घरातून सोन्याच्या विटांचे 37.064 किलो वजनाचे तुकडे जप्त करण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या सोन्याची किंमत 54 कोटी रुपये आहे.छापेमारीत 13 ग्रॅम चांदीचे तुकडे, चार मोबाईल फोन, 3,755 रुपये रोख रक्कम आणि सोने लपवण्यासाठी वापरण्यात आलेल्या बॅगाही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.
संशय टाळण्यासाठी घेतला भिकाऱ्याचा वेश
अक्षय परशुराम बनसोडे (वय 32) हा महाराष्ट्रातील सांगलीचा रहिवासी आहे. त्याने गुवाहाटीच्या गांधी बस्ती परिसरात एक घर भाड्याने घेतले होते. पोलिसांनी चौकशी केली असता या प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आली.स्थानिक नागरिकांना संशय येऊ नये म्हणून तो दिव्यांग भिकारी बनून फिरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तो म्यानमार मार्गे आसाममध्ये सोन्याची तस्करी करत होता.29 जून रोजी ही कारवाई करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेले सोने 24 कॅरेट शुद्ध असल्याचे तपासातून समोर आले आहे. आसाम पोलिसांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी सोन्याची कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.तपासादरम्यान या प्रकरणाचे संबंध मिडल ईस्ट, म्यानमार आणि भारतातील विविध शहरांमध्ये पसरलेल्या आंतरराष्ट्रीय सोने तस्करीच्या नेटवर्कशी असल्याची माहिती समोर आली आहे. या नेटवर्कमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास आसाम पोलीस करत आहेत.