गडचिरोली,
avishyant-panda : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत जिल्ह्यातील स्थानिक कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन करून त्यांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्याचा स्वतंत्र व वैशिष्ट्यपूर्ण ब्रँड विकसित करण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असा निर्देश जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला. कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकारी व कर्मचार्यांनी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून शेतकर्यांना त्यांचा जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्यासाठी समन्वयाने कार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.
खरीप हंगामाच्या पृष्ठभूमीवर पिकावरील कीड-रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप), प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना आणि कपास कांती अभियान अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय कार्यशाळा व आढावा सभेत ते मार्गदर्शन करत होते.
कार्यशाळेत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, क्रॉपसॅप, कपास कांती अभियान, ग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड तसेच डिजिटल तंत्रज्ञानाचा शेतीतील वापर या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. खरीप हंगामाच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेली ही कार्यशाळा कृषी विभागाच्या क्षेत्रीय यंत्रणेचे सक्षमीकरण, पीक संरक्षणाबाबत वेळेवर मार्गदर्शन, कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन तसेच ग्रामीण भागात अन्नप्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी सांगितले.
नोडल अधिकारी तथा कृषी उपसंचालक मधुगंधा गौतम-जुलमे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची कार्यपद्धती, उद्दिष्टे, लाभार्थ्यांसाठी उपलब्ध सुविधा आणि अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. विस्तार विभागाचे तांत्रिक अधिकारी गणेश दुरंदे यांनी ‘क्रॉप्स 2.0’ पच्या वापराबाबत तांत्रिक सादरीकरण करून डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पीक पाहणी, माहिती संकलन आणि शेतकर्यांपर्यंत तांत्रिक सल्ला प्रभावीपणे पोहोचविण्याची प्रक्रिया स्पष्ट केली.
प्रकल्प उपसंचालक (आत्मा) रवी हरणे यांनी ग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड योजनेंतर्गत कृषी पायाभूत सुविधा उभारणीसाठी उपलब्ध आर्थिक सहाय्य, योजनेची उद्दिष्टे आणि लाभार्थ्यांनी या योजनेचा प्रभावी लाभ कसा घ्यावा याबाबत माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी जितेंद्र कुंजाम यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत आवश्यक परवाने, अन्न सुरक्षा मानके, नोंदणी प्रक्रिया आणि गुणवत्तापूर्ण अन्नप्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.
पीक संरक्षणाच्या दृष्टीने खरीप पिकांवरील विविध किडी व रोगांची ओळख, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच वैज्ञानिक व्यवस्थापनाबाबत डॉ. प्रीतम चिरडे यांनी उपस्थितांना सविस्तर माहिती दिली. या कार्यशाळेला कृषी विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.