आभाळ दाटलं...आता मुसळधार पावसाची तयारी!

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
मुंबई,
heavy-rainfall-maharashtra गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने आज पुणे, सातारा, घाटमाथा, सांगली, सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला असून, २० जुलैनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पुन्हा पूर्ण ताकदीने सक्रिय होण्याची शक्यता वर्तवली आहे.जुलै महिन्याचा अर्धा कालावधी उलटून गेला असला तरी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला नाही. महिन्याच्या सुरुवातीला मुंबई, कोकण, पुणे आणि घाटमाथा भागात चांगल्या सरी कोसळल्या होत्या. मात्र उर्वरित भागात पावसाने दडी मारल्याने शेतीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी पेरणीनंतर पिके कोमेजू लागली असून, दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. यंदाच्या मान्सूनवर एल निनोचा प्रभावही जाणवत असल्याचे चित्र आहे.
 
 

rains 
 
रायगड जिल्ह्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. कर्जत, खोपोली आणि खालापूर परिसरात चांगल्या सरी बरसल्या. काही दिवसांपूर्वी आलेल्या पुरानंतर जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता उत्तर आणि दक्षिण रायगडमध्ये पुन्हा पाऊस सुरू झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.हिंगोली जिल्ह्यातही काही दिवस पाऊस न झाल्याने पिके सुकण्याची वेळ आली होती. मात्र बुधवारी सायंकाळी औंढा नागनाथसह तालुक्यातील ग्रामीण भागात जोरदार पावसाने हजेरी लावली. या सरींमुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, पिकांना नवसंजीवनी मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
 
 
बीड जिल्ह्यातील केज शहर आणि परिसरातही पावसाने दमदार हजेरी लावली. मुसळधार सरींमुळे शहरातील अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी साचले. या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असला तरी जिल्ह्याला अजूनही जोरदार आणि सलग पावसाची गरज असल्याचे शेतकरी सांगत आहेत.परभणी जिल्ह्यातील जिंतूर शहर आणि आसपासच्या भागातही अनेक दिवसांच्या उघडीपीनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मात्र हा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने शेतीसाठी तो अद्याप अपुरा असल्याचे चित्र कायम आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.