बेकायदेशीर सावकारांवर सहकार विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

-पुसद परिसरात एकाचवेळी चार ठिकाणी धाडी -मोठ्या प्रमाणात कागदपत्रे जप्त -2 महिन्यात 10 पेक्षा जास्त कारवाया

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
पुसद, 
illegal-moneylenders : पुसद शहर व परिसरात बेकायदेशीर सावकारी करणाèयांविरोधात सहकार विभागाने मोठी व समन्वित कारवाई करत एकाच वेळी चार ठिकाणी धाडी टाकल्या. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 च्या कलम 16 अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सहकार विभाग, महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या धाडसत्रात मोठ्या प्रमाणात धनादेश, स्टॅम्प पेपर, दस्तऐवज, डायèया, चिठ्ठ्या तसेच एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध सावकारी करणाèयांचे धाबे दणाणले आहेत. मागील 2 महिण्यात पुसद परिसरात 10 पेक्षा जास्त धाडी टाकण्यात आल्या आहेत हे येथे उल्लेखनीय.
 
 
 
jh
 
 
 
तालुक्यातील ओमनगर, श्रीरामपूर येथील माधव किसन गव्हाणे व ग्रीन पार्क-2 येथील सुभाष दुलबा ढवळे यांनी बेकायदेशीर सावकारी व्यवसायातून व्याजाच्या पैशांसाठी छळ होत असल्याची तक्रार जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ यांच्याकडे दाखल केली होती. या तक्रारींची गंभीर दखल घेत सहकार विभागाने नियोजनबद्ध धाडसत्र राबविले. या कारवाईत संतोष अजबराव कदम (मूळ रा. गोळ बाजार, ता. कळमनुरी, जि. हिंगोली, सध्या शेबाळपिंपरी येथील घर व बसस्थानकाजवळील हॉटेल येथून 19 तर समाधान वामन पाटील (रा. अनिल पवार बंजारा कॉलनी, पुसद) यांच्या राहत्या घरातून 9 धनादेश, कोरे दस्तऐवज, स्टॅम्प पेपर, चिठ्ठ्या, डायèया तसेच खरेदीखतांचा समावेश असेलेली आक्षेपार्ह कागदपत्र जप्त करण्यात आली.
 
 
प्रकाश श्यामराव चोरमले (रा. ईसापूर, ता. पुसद) यांच्या घराचीही कसून झडती घेण्यात आली. तर दिलीप सखाराम उतरवार (रा. ग्रीन पार्क-1, पुसद) यांच्या घरातून सर्वाधिक 26 आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली. यात धनादेश, संशयास्पद चिठ्ठ्या, डायèया तसेच एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे. सहकार विभागाने जप्त केलेल्या सर्व कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाणार असून, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम, 2014 मधील तरतुदींनुसार संबंधितांवर पुढील कायदेशीर कारवाई व गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली.
 
 
 
ही संपूर्ण कारवाई सावकारांचे सहायक निबंधक तथा सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था (पुसद) केएस मस्के यांच्या मार्गदर्शनात पार पडली. कारवाईत सहकार विभागातील तसेच पुसद तहसील कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी, पोलिस प्रशासनातील अधिकारी, अंमलदार तसेच व्हिडिओ चित्रीकरण पथक सहभागी होते.
 
 
जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा निबंधक (सावकारी), तहसीलदार (पुसद) तसेच तालुकास्तरीय प्रशासकीय समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली सहकार, महसूल व पोलिस प्रशासनाने संयुक्तरीत्या ही कारवाई पूर्ण केली.