ममता बॅनर्जींना मोठा धक्का! कोयल मल्लिक यांचा राजीनामा

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
कोलकाता,
koel-mallick : तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आणि लोकप्रिय अभिनेत्री कोयल मल्लिक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे पश्चिम बंगालच्या राजकारणात नवीन चर्चांना उधाण आले आहे. हा निर्णय तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यासाठी एक मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर लगेचच कोयल मल्लिक यांनी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेतली. या भेटीचे अधिकृत कारण अजून समोर आले नसले, तरी राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
 
 
koel-mallick
 
 
 
संसदेच्या एकाही अधिवेशनात नव्हत्या उपस्थित
 
विशेष म्हणजे, कोयल मल्लिक राज्यसभा सदस्य बनल्यापासून संसदेच्या एकाही अधिवेशनाला उपस्थित राहिल्या नव्हत्या. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी तृणमूल काँग्रेसने त्यांना पश्चिम बंगालमधून राज्यसभेसाठी आपली उमेदवारी जाहीर केली होती. त्यानंतर १६ मार्च २०२६ रोजी झालेल्या निवडणुकीत त्या निवडून आल्या आणि ६ एप्रिल २०२६ रोजी त्यांनी राज्यसभा सदस्य म्हणून शपथ घेतली होती. एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून त्यांची राजकारणातील एन्ट्री हा तृणमूल काँग्रेसचा मोठा डाव मानला गेला होता. परंतु, राज्यसभेत कोणतीही सक्रिय भूमिका बजावण्यापूर्वीच त्यांनी दिलेल्या राजीनाम्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
१५ वर्षांनंतर तृणमूल काँग्रेसने गमावली सत्ता
 
याच वर्षी झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुका तृणमूल काँग्रेससाठी अत्यंत निराशाजनक ठरल्या. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या या पक्षाला दारूण पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेस अवघ्या ८० जागांवर आटोपली, तर भारतीय जनता पक्षाने २०८ जागा जिंकून पहिल्यांदाच पश्चिम बंगालमध्ये आपले सरकार स्थापन केले. निवडणूक निकालानंतर अवघ्या एका महिन्यात, म्हणजेच जून २०२६ मध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी बंडखोरी झाली आणि पक्ष दोन गटांत विभागला गेला. पक्षातील अनेक आमदार आणि खासदारांनी ममता बॅनर्जी यांची साथ सोडून वेगळा गट तयार केल्यामुळे पक्षासमोरील अडचणी आधीच वाढल्या आहेत, त्यातच आता हा राजीनामा समोर आला आहे.