सीएडी कॅम्पमध्ये ५० हजार वृक्षलागवड महाअभियानाचा शुभारंभ

१५ दिवसांत २५ एकरात होणार लागवड

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
पुलगाव,
mega campaign to plant सामाजिक वनीकरण विभाग वर्धा यांच्या पुढाकाराने आणि सीएडी कॅम्प पुलगावच्या वतीने पर्यावरण संवर्धन व हरित भविष्याच्या संकल्पनेला बळ देणार्या ५० हजार वृक्षलागवड महाअभियानाचा शुभारंभ सीएडी कॅम्पमध्ये बुधवारी उत्साहात करण्यात आला. या महाअभियानाच्या पहिल्या टप्प्यात एकाच दिवशी तब्बल १० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली असून येत्या १५ दिवसात २५ एकरात ५० हजार लागवडीचे उद्दीष्ट आहे. या अभियानात शहरातील शाळांनी सुद्धा सहभाग नोंदविला आहे.
 

mega campaign to plant 
 
राज्य शासनाच्या ३०० कोटी वृक्ष लागवडीत सीएडी कॅम्पने सहभाग नोंदविला आहे. दरवर्षी सीएडी कॅम्पमध्ये वृक्षारोपण करण्यात येते. मात्र, यंदा ५० हजार वृक्षलागवडीचे उद्दीष्ट समोर ठेवून बुधवारी एकाच दिवशी सामाजिक वनीकरण विभाग, सीएडी कॅम्प येथील अधिकारी, शहरातील शाळांमधील विद्यार्थी आणि पालक तसेच नागरिकांनीही सहभाग नोंदवून तब्बल १० हजार वृक्षांची लागवड केली.
या वृक्षारोपण कार्यक्रमात सीएडी कॅम्पचे समादेशक ब्रिगेडियर प्रशांत कुमार, लष्करी अधिकारी, सैनिक, त्यांचे कुटुंबीय तसेच परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थी, पालकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. यावेळी प्रत्येकाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. याप्रसंगी ब्रिगेडियर प्रशांत कुमार यांनी विद्याथ्र्यांशी संवाद साधत वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व, हवामान बदलाची गंभीरता आणि प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारण्याची गरज गरज असल्याचे मत व्यक्त केले. वृक्ष लावण्याबरोबरच त्याचे संगोपन करणे हीदेखील प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी सुहास बडेकर म्हणाले की, या अभियानाचा उद्देश केवळ वृक्षलागवड करणे नसून पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करणे, नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविणे आणि सामुदायिक एकात्मतेला चालना देणे हा आहे.mega campaign to plant परिसरातील पडित जमिनी हिरव्यागार करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभाग सातत्याने प्रयत्नशील असून या अभियानातून हरित व समृद्ध पर्यावरण निर्माण करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे. दरम्यान, विद्यार्थी आणि नागरिकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाची शपथ घेतली. या उपक्रमामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्याबरोबरच समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला मिलिटरी स्टेशन कमांडंट ब्रिगेडियर प्रशांत कुमार, डेप्युटी कमांडंट कर्नल मनोज कुमार, लष्करी अधिकारी व जवान, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी सुहास बडेकर, सहाय्यक वनरक्षक अंकिता तेलंग, वनक्षेत्रपाल किशोर आश्रम, देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे, सारंग रघाटाटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.