दारव्हा नप सभेत गाजला वाचनालयाचा विषय

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा, 
darwha-municipal-council-meeting : दारव्हा नगर परिषदेच्या विशेष सभेत नगर वाचनालयाच्या जागेवर शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारण्याच्या प्रस्तावावरून सत्ताधारी व विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. या विषयावर चर्चा सुरू होताच मित्रपक्ष भाजपाचे दोन व विरोधी पक्ष काँग्रेसचे सात नगरसेवकांनी प्रस्तावाला ठाम विरोध दर्शवित वाचनालयाची जागा कायम ठेवण्याची मागणी केली.
 
 
 
jk
 
 
 
विरोधकांनी सभेत मांडलेल्या भूमिकेनुसार, दारव्हा नगर वाचनालयाला सुमारे 140 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असून ते शहराच्या शैक्षणिक, सामाजिक व बौद्धिक वारशाचे प्रतीक आहे. वाचनालयात सुमारे 40 हजार ग्रंथांचा संग्रह असून दररोज 250 ते 300 वाचक येथे येऊन लाभ घेतात. यामध्ये शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक-युवती, स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
 
 
वाचनालयासारख्या ज्ञानकेंद्राच्या जागेवर व्यावसायिक शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारणे शहराच्या शैक्षणिक हिताला बाधा पोहोचवणारे ठरेल, असा युक्तिवाद विरोधकांनी केला. शहराच्या ज्ञानपरंपरेचे जतन करण्यासाठी वाचनालयाचे आधुनिकीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्या, मात्र त्याचे अस्तित्व धोक्यात आणू नये, अशी मागणी सभेत करण्यात आली.
 
 
दरम्यान, भाजपा नगरसेवक धनंजय बलखंडे यांनीही नगर परिषद प्रशासनाला दिलेल्या पत्रामध्ये वाचनालयाची जागा वाचनालयासाठीच कायम ठेवावी, तेथे कोणताही व्यावसायिक प्रकल्प उभारू नये व वाचनालयाचे आधुनिकीकरण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.
नपच्या विशेष सभेमध्ये नगर वाचनालयाच्या जागी शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधकाम करण्याच्या विषयावर विरोधकांनी विरोध दर्शविला. ही इमारत संपूर्णपणे जीर्ण झालेली आहे. त्या ठिकाणी पार्किंगची मोठी समस्या असल्याने नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी सुसज्ज शॉपिंग कॉम्प्लेक्सच सोबतच दुसèया माळ्यावर अद्यायावत नगर वाचनालयाचे बांधकाम करून देण्यात येणार आहे. या शॉपिंग कॉम्प्लेक्स व नगर वाचनालयाच्या नवीन इमारतीमुळे विकासासोबतच नागरिकांच्या पार्कींग समस्या सोडवल्या जाईल.
- सुनिल चिरडे,
नप अध्यक्ष, दारव्हा