अमरावती,
mandatory-helmet-rule : शहरात दुचाकीस्वारांना २४ जुलैपासून हेल्मेट वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या संदर्भातील अधिसूचना आज, गुरुवारी काढण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन आणि नागरिकांच्या प्राणांचे रक्षण करणे ही पोलिस प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे पोलिस विभागाने स्पष्ट केले आहे. अमरावती पोलिस आयुक्तालय हद्दीत २०२४ मध्ये एकूण ४५४ अपघात झाले. २०२५ मध्ये एकूण ४१७ अपघात झाले तर १ जानेवारी ते ३० जून २०२६ पर्यंत २१० अपघात झाले आहेत. एकूण अपघातांपैकी सुमारे ६० टक्के अपघात मोटारसायकलचालकांचे होतात. मोटारसायकल अपघातांमध्ये स्वारांचा मृत्यू हा डोक्यात हेल्मेट नसल्यामुळे होतो, हे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १२९ (सुधारित कायदा २०१९) नुसार सर्व दुचाकीचालक आणि त्यांच्या मागे बसणाऱ्या व्यक्तीला आय.एस.आय. मार्क असलेले हेल्मेट वापरणे कायद्याने बंधनकारक आहे. दुचाकी वाहन अपघातामध्ये वाढलेले मृत्यूचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
दंडात्मक कारवाई होणार
पोलिस आयुक्तालय हद्दीत येणारे सर्व राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, ग्रामीण, शहरी व इतर रस्त्यांवर दुचाकी चालवताना चालक व मागे बसणाऱ्या व्यक्तीस प्रमाणित हेल्मेट घालणे २४ जुलैपासून अनिवार्य करण्यात येणार आहे. त्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. दुचाकीचालक आणि त्याच्या मागे बसलेले व्यक्ती वाहन चालविताना विनाहेल्मेट आढळल्यास मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या दुचाकीचालकांचा वाहतूक परवाना ३ महिन्यांकरिता निलंबित केला जाऊ शकतो. हेल्मेट हे केवळ पोलिसांच्या दंडापासून वाचण्याचा उपाय नसून, तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षेचे कवच आहे. वाहतूक विभागातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, या मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन जबाबदार नागरिक म्हणून दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर करून आपले कर्तव्य पार पाडावे.