१६ वर्षाचा संसार तुटला...उर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
मुंबई
urmila kanetkar मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे यांच्या नात्याबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले होते. दोघांनी घटस्फोट घेतल्याच्या चर्चांनंतर अखेर आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत परस्पर संमतीने आणि सामंजस्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत घोषणा केली आहे.
 

marathi actors adinath kothare and urmila kanetkar end 16 year marriage with mutual divorce 
दोघांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, “आमचे मित्र, मीडिया आणि हितचिंतकांनो, खूप विचार केल्यानंतर आम्ही, आदिनाथ महेश कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर, यांनी एकमेकांच्या संमतीने आणि सामंजस्याने पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिजा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (को-पॅरेंटिंग) करत आहोत. आमच्या मनात एकमेकांबद्दल आणि एकत्र घालवलेल्या वर्षांबद्दल नेहमीच आदर राहील.”
पुढे त्यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे, “गेल्या काही वर्षांत मीडिया आणि तुम्हा सर्वांनी आम्हाला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी आम्ही मनापासून आभारी आहोत. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही तुमचे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी राहतील, अशी आम्हाला आशा आहे. त्यामुळे आमच्या या खाजगी प्रवासात मीडिया आणि जनतेने आमच्या प्रायव्हसीचा आदर करावा, ही आमची नम्र विनंती आहे. या विषयावरील आमचे हेच एकमेव अधिकृत वक्तव्य असेल. यानंतर आम्ही याबाबत कोणतीही प्रतिक्रिया किंवा चर्चा करणार नाही. तुमच्या प्रेमासाठी आणि समजूतदारपणासाठी मनापासून धन्यवाद.”
आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांनी २०११ साली विवाह केला होता. मराठी चित्रपट *शुभमंगल सावधान*च्या चित्रीकरणादरम्यान दोघांची पहिली ओळख झाली होती. या चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. त्यांना जिजा ही मुलगी असून, तिच्या संगोपनाची जबाबदारी दोघे मिळून पार पाडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तब्बल १६ वर्षांच्या वैवाहिक सहजीवनानंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होत आयुष्याच्या नव्या टप्प्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे.