मुंबई
milk racket अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) धडक कारवायांमुळे हॉटेल व्यावसायिक, खाद्यपदार्थ विक्रेते आणि दूध डेअरी चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत FDAने भेसळयुक्त अन्नपदार्थांची अनेक प्रकरणे उघडकीस आणली आहेत. अशातच मुंबईतील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, चहासाठी वापरल्या जाणाऱ्या दुधात भेसळ होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
अन्न व औषध प्रशासन आणि मुंबई पोलीस गुन्हे शाखा युनिट-11 यांनी गोरेगाव परिसरात संयुक्त कारवाई करत भेसळयुक्त दुधाच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत ‘अमूल’ आणि ‘गोकुळ’ या नामांकित ब्रँडच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये भेसळ करणाऱ्या टोळीचा खुलासा झाला असून, या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.FDAच्या अधिकाऱ्यांच्या तपासात ‘अमूल’ आणि ‘गोकुळ’ या ब्रँडच्या दुधाच्या पिशव्यांमध्ये अशुद्ध पाणी मिसळून भेसळ केली जात असल्याचे आढळून आले. या दोन्ही कंपन्यांचे दूध बाजारात मोठ्या प्रमाणावर विकले जाते. मात्र ग्राहकांना अशुद्ध पाणी मिसळलेले भेसळयुक्त दूध पुरवले जात असल्याचे या कारवाईत उघड झाले.
या प्रकरणी कृष्णा वेंकय्या लिंगम पल्ली आणि रवी कनह्या पटिपाका या दोन मुख्य आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चौकशीदरम्यान हे भेसळयुक्त दूध गोरेगाव परिसरातील निवासी भाग तसेच चहाच्या टपऱ्यांवर पुरवले जात असल्याची कबुली आरोपींनी दिली. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला होता.कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून 558 लिटर भेसळयुक्त दूध, 224 बनावट दुधाच्या पिशव्या, मोबाईल फोन तसेच दुधात भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 50 हजार 304 रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.या कारवाईमुळे गोरेगाव परिसरातील एका मोठ्या भेसळयुक्त दूध रॅकेटचा पर्दाफाश झाला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.