मुंबई
thakurli station मुंबई उपनगरी रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. मुंबईहून अंबरनाथच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये जागेवरून झालेल्या वादाचे रूपांतर हिंसक घटनेत झाले. या वादातून एका प्रवाशावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात संबंधित प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही धक्कादायक घटना मध्यरात्री सुमारे १२.१० वाजण्याच्या सुमारास ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, लोकलच्या जनरल डब्यात दोन प्रवाशांमध्ये जागेवरून वाद सुरू झाला होता. काही वेळातच हा वाद वाढत गेला आणि त्याचे रूपांतर मारहाणीत झाले.
लोकल ट्रेन ठाकुर्ली स्थानकात पोहोचताच तीन जणांनी एका प्रवाशावर अचानक कोयत्याने हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे डब्यात एकच गोंधळ उडाला आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी ठाकुर्ली स्थानकावर उतरून घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई करत जखमी प्रवाशाला कल्याण स्थानकावर ताब्यात घेतले आणि पुढील उपचारासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. सध्या त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.दरम्यान, या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. आरोपींची ओळख पटवण्यासाठी स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, त्यांना लवकरात लवकर अटक करण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.