शहरातील एटीएम पुन्हा चोरट्यांच्या निशाण्यावर

डोंगरगावात १३.४५ लाखांची चोरी, हुडकेश्वरातही प्रयत्न

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
nagpur atm theft शहरातील बँकांच्या एटीएमची सुरक्षा पुन्हा एकदा धोक्यात आली आहे. बुधवारी पहाटे अवघ्या काही तासांच्या अंतराने दोन वेगवेगळ्या ठिकाणी एटीएम फोडण्याच्या घटना घडल्या. हिंगणा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरमधील दोन मशीन गॅस कटरने कापून चोरट्यांनी १३.४५ लाखांहून अधिक रक्कम लंपास केली. तर हुडकेश्वर रोडवरील इंगोळे नगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, तेथील रोकड सुरक्षित राहिली.
 

nagpur, atm theft, bank of india, sbi atm, dongargaon, hudkeshwar, nagpur crime, robbery case, gas cutter theft, bank robbery, police investigation, maharashtra news, crime update, atm security, interstate gang 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंगरगावातील ताज सैलानी इमारतीतील एटीएममध्ये पहाटे सुमारे ४.२० वाजता पाचहून अधिक आरोपी घुसले. त्यांनी प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर स्प्रे करून ते निकामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, एक कॅमेरा सुरू राहिल्याने आरोपींची हालचाल त्यात कैद झाली. अवघ्या दहा मिनिटांत गॅस कटरच्या साहाय्याने दोन्ही एटीएम मशीन कापून एका मशीनमधून सुमारे १२.४५ लाख, तर दुसऱ्यातून एक लाख रुपये चोरून आरोपी पसार झाले. पहाटे धूर दिसल्याने आणि जळक्या वायरचा वास आल्याने इमारतीच्या मालकाने खाली येऊन पाहिले असता एटीएममधून धूर निघत असल्याचे दिसले. त्यांनी अग्निशमन यंत्रांच्या साहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यानंतर मशीन कापून चोरी झाल्याचे उघडकीस आले.
हुडकेश्वर रोडवरील इंगोले नगर येथील एसबीआयच्या एटीएममध्येही चोरट्यांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रोकड चोरता आली नाही.
या दोन्ही घटनांचा तपास हिंगणा आणि हुडकेश्वर पोलिसांसह गुन्हे शाखा करीत आहेत. आंतरराज्यीय टोळी, विशेषत: हरियाणातील टोळीचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, टोल नाक्यांवरील नोंदी आणि संशयित एसयूव्ही वाहनाचा मागोवा पोलिस घेत आहेत.