नवी दिल्ली,
New leads in the NEET scandal नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय)ने महत्त्वाचा खुलासा केला आहे. विशेष न्यायालयात सादर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील लातूर येथील एका कोचिंग सेंटरच्या चालकाने परीक्षेपूर्वी रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवण्यासाठी कथितरित्या ५ लाख रुपयांचा व्यवहार केला होता. सीबीआयच्या मते, हा प्रकार पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यात अनेक व्यक्तींचा सहभाग होता.तपास यंत्रणेने न्यायालयाला सांगितले की, लातूरमधील कोचिंग सेंटरचे चालक शिवराज रघुनाथ मोटेगावकर यांनी इतर आरोपींसोबत संगनमत करून परीक्षेपूर्वी रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवले. या बदल्यात ५ लाख रुपये देण्यात आल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

सीबीआयच्या तपासानुसार, हे प्रश्न पी. व्ही. कुलकर्णी यांच्याकडून मिळाले होते. कुलकर्णी हे नीट-यूजी २०२६ ची प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या पॅनेलशी संबंधित होते. तसेच, मोटेगावकर यांचा मुलगा कुलकर्णी यांच्या रसायनशास्त्राच्या शिकवणी वर्गात शिक्षण घेत होता. त्याच माध्यमातून हे प्रश्न उपलब्ध करून देण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेने व्यक्त केला आहे.तपासादरम्यान सीबीआयने मोटेगावकर यांचा मोबाईल जप्त केला. त्यामध्ये ३६ छायाचित्रे आढळली, त्यापैकी पाच छायाचित्रे डुप्लिकेट होती. उर्वरित छायाचित्रांमध्ये रसायनशास्त्राचे १३२ हस्तलिखित प्रश्न नोंदवलेले होते. तपासात यापैकी १११ प्रश्न एनटीएच्या नीट-यूजी २०२६ च्या मास्टर प्रश्नसंचाशी जुळत असल्याचा दावा करण्यात आला आहे. हे प्रश्न कुलकर्णी यांच्या वर्गात दिलेल्या नोट्सच्या आधारे तयार करण्यात आल्याचेही सीबीआयने न्यायालयात नमूद केले.
या प्रकरणात मोटेगावकर यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जालाही सीबीआयने विरोध केला आहे. उपलब्ध प्राथमिक पुरावे त्यांच्या सहभागाकडे स्पष्टपणे निर्देश करत असून, जामीन मंजूर झाल्यास तपासावर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे एजन्सीने न्यायालयात सांगितले.नीट-यूजी २०२६ परीक्षा ३ मे रोजी पार पडली होती. पेपरफुटीच्या आरोपांनंतर १२ मे रोजी राष्ट्रीय चाचणी एजन्सीने परीक्षा रद्द केली. त्यानंतर २१ जून रोजी ही परीक्षा पुन्हा घेण्यात आली. या प्रकरणातील संपूर्ण रॅकेट उघड करण्यासाठी सीबीआयचा तपास अद्याप सुरू आहे.