मालकाची हत्या करून मृतदेहासह ट्रक जाळला

चिखलसावंगी शिवारातील घटना

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
मोर्शी, 
owner-murdered : नजीकच्या चिखलसावंगी येथील प्रवासी निवाऱ्याजवळ एक जळत असलेला ट्रक आढळला. आग विझविल्यानंतर त्यात चालकाचाही जळालेला मृतदेह आढळून आला. यावरून चालकाची हत्या करून मृतदेह ट्रकसह जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
 
 
amt
 
 
 
घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मोर्शी पोलिस स्टेशनच्या हद्दीतील चिखलसावंगी येथील प्रवासी निवाऱ्याजवळ बुधवारी, १५ जुलैला रात्री अकरा वाजताच्या सुमारास उभा असलेल्या एका ट्रकची केबिन जळत असल्याची माहिती ११२ क्रमांकावर मोर्शी पोलिसांना मिळाली होती. मोर्शी पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन अग्निशामक विभागाच्या गाडीच्या मदतीने ट्रकची आग विझविली. मात्र, गुरुवारी सकाळी त्या ट्रकमधून दुर्गंध येत असल्यामुळे पुन्हा मोर्शी पोलिसांना माहिती देण्यात आली. जळालेल्या ट्रकची पोलिसांनी पाहणी केली असता ट्रकच्या केबिनच्या आत पूर्णपणे जळालेला मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती चंद्रपूर येथील ट्रक मालकाला पोलिसांनी बुधवारी रात्रीच दिली होती. वृत्तलिहीपर्यंत पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम सुरू होते. अधिक तपास मोर्शी पोलिस करीत आहे.
 
 
 
ट्रक मालकाचे नातेवाईक गुरुवारी सकाळी मोर्शी येथे पोहोचले असता त्यांना पुढील सर्व प्रकार पोलिसांनी सांगितला. ट्रकमालक उमेश गौरीशंकर मिश्रा १ जुलैला नागपूर येथून काही माल घेऊन गुजरातला गेले होते. सदर माल गुजरात येथे खाली केल्यानंतर तेथून नागपूरसाठी भाडे लागले असल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली. मंगळवार, १४ जुलैपासून ट्रकमधील जीपीएस यंत्रणा बंद असल्याची माहिती सुद्धा ट्रकमालकाच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. उमेश मिश्रा यांना अज्ञात मारेकऱ्यांनी मारून ट्रकमध्ये जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोर्शी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी उमेश पाटील, पोलिस निरीक्षक राहुल आठवले, अमरावती जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी भेट दिली असून फॉरेन्सिक टीम सुद्धा कसून तपास करीत आहे.