गोंदिया,
paddy-payments-pending : गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनतर्फे रब्बी हंगाम 2025-26 अंतर्गत सुरू असलेली आधारभूत धान खरेदी योजना अंतिम टप्प्यात असून जिल्ह्यात आतापर्यंत 80 हजार 950 शेतकर्यांकडून तब्बल 34 लाख 24 हजार 563.83 क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी 43 हजार 219 शेतकर्यांच्या खात्यात 452 कोटी 77 लाख 86 हजार 569 रुपये थेट जमा करण्यात आले आहेत. असे असले तरी धान उत्पादकांचे 206.2 कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही अदा होणे बाकी आहे.
जिल्हा पणन कार्यालयाच्या अहवालानुसार, धान खरेदीसाठी जिल्ह्यात 197 ऑनलाईन नोंदणीकृत खरेदी केंद्रांपैकी 194 केंद्रांना मंजुरी देण्यात आली असताना प्रत्यक्षात 193 केंद्रांवर खरेदी प्रक्रिया राबविण्यात आली. 30 जून 2026 पर्यंत 78 हजार 122 शेतकर्यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. हमीभाव योजनेअंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या धानाचे एकूण मूल्य 811 कोटी 27 लाख 91 हजार 713 रुपये इतके आहे. दरम्यान, शासनाकडून 605 कोटी 25 लाख 56 हजार 323.10 रुपयांचा निधी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आला असून आतापर्यंत 452 कोटी 77 लाख 86 हजार 569.51 रुपयांचे चुकारे शेतकर्यांना अदा करण्यात आले आहे. मात्र, देयकांच्या बाबतीत अजूनही मोठी रक्कम प्रलंबित असल्याचे दिसत आहे. धान उत्पादकांचे आतापर्यंत 206 कोटी 2 लाख 35 हजार 390 रुपयांचे चुकारे अद्यापही प्रलंबित आहेत. त्यामुळे उर्वरित देयकांच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो शेतकर्यांचे लक्ष आता चुकार्यांची रक्कम खात्यात कधी जमा होते, याकडे लागले आहे. वेळेत देयके मिळाल्यास चालू खरीप हंगामात शेतकर्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मकाचे 19.73 कोटी प्रलंबित...
जिल्ह्यात 1,657 शेतकर्यांकडून 86 हजार 149 क्विंटल मक्याची खरेदी करण्यात आली असून त्याची किमत 20 कोटी 67 लाख 57 हजार 600 रुपये आहे. त्यापैकी 77 शेतकर्यांना 93 लाख 88 हजार 800 रुपये अदा करण्यात आले आहे. तर 19 कोटी 73 लाख 68 हजार 800 रुपये अद्याप अदा होणे बाकी आहे.
शासनाकडून 605 कोटी 25 लाख 56 हजार 323.10 रुपयांचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्यातून 452 कोटी 77 लाख 86 हजार 569.51 रुपयांचे चुकारे शेतकर्यांच्या बँक खात्यात अदा करण्यात आले आहे. उर्वरीत शेतकर्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा करण्यात येत आहे.
- विवेक इंगळे,जिल्हा पणन अधिकारी, गोंदिया