मरणोत्तर नेत्रदानातून मानवतेचा आदर्श इंगळे कुटुंबीयांचा प्रेरणादायी निर्णय

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
बुलढाणा, 
posthumous-eye-donation : मेहकर तालुक्यातील पिंप्री माळी येथील दिवंगत सुशीला श्रीराम इंगळे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी मरणोत्तर नेत्रदानाचा निर्णय घेत मानवतेचा प्रेरणादायी आदर्श समाजासमोर ठेवला. दुःखाच्या प्रसंगातही सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या मुलगा अशोक इंगळे व मुलगी रत्नमाला इरातार यांनी नेत्रदानासाठी पुढाकार घेतला.
 
 
 
posthumous-eye-donation
 
 
 
जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथील नेत्रदान पथकाने तत्परतेने आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून नेत्र संकलन केले. या नेत्रदानामुळे दृष्टीहीन व्यक्तींना दृष्टी मिळण्याची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आयुष्यात आशेचा नवा प्रकाश निर्माण होणार आहे. नेत्रदान प्रक्रियेदरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. रवी शिंदे, नोडल अधिकारी अविनाश चिंचोले, नेत्रतज्ज्ञ डॉ. देशमुख, नेत्रदान समुपदेशक योगेश सिरसाट तसेच डॉ. अमोल उगले आणि सौरभ हिवाडे यांचा समावेश असलेल्या नेत्रदान चमूने मोलाची भूमिका बजावली. जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंगळे कुटुंबीयांच्या या निर्णयाचे कौतुक करत समाजातील नागरिकांनीही मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करावा, असे आवाहन केले आहे. नेत्रदानामुळे मृत्यूनंतरही दोन दृष्टीहीन व्यक्तींना प्रकाशमय जीवनाची नवी संधी मिळू शकते. त्यामुळे नेत्रदान हे सर्वश्रेष्ठ दानांपैकी एक मानले जाते. दिवंगत सुशीला श्रीराम इंगळे यांच्या कुटुंबीयांनी दुःखाच्या क्षणी घेतलेला हा संवेदनशील आणि समाजहिताचा निर्णय इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणारा असून, मानवतेचा संदेश देणारे हे कार्य सर्वत्र कौतुकास पात्र ठरत आहे.