गडचिरोलीच्या मातीचा अभिमान : डॉ. प्रकाश हलामी

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
वेध...
 
 
नंदकिशोर काथवटे
dr prakash halami मोठी स्वप्ने पाहण्यासाठी मोठ्या शहरात जन्म घ्यावा लागत नाही. मोठे ध्येय आणि त्यासाठी झटणारे मन असले की दुर्गम पाड्यातूनही जगाच्या शिखरावर पोहोचता येते. या वाक्याचा जिवंत पुरावा म्हणजे गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील खरमतटोला या छोट्याशा आदिवासी पाड्यातून जागतिक संशोधन क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणारे डॉ. प्रकाश एम. हलामी. गडचिरोली म्हटले की अनेकांच्या डोळ्यासमोर नक्षलवाद, दुर्गम भाग, मागासलेपण आणि विकासाच्या समस्या उभ्या राहतात. मात्र या जिल्ह्याची खरी ओळख ही इथल्या मातीत दडलेल्या जिद्दीची, कष्टाळूपणाची आणि प्रतिभेची आहे. या भूमीतून अनेक खेळाडू, अधिकारी, कलाकार घडले; आता त्याच भूमीने जागतिक दर्जाचा वैज्ञानिकही देशाला दिला आहे. ही बाब केवळ गडचिरोलीसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची आहे.
 

dr prakash halami 
 
 
साय-रँक ग्लोबल रजिस्ट्री-२०२५ मध्ये जगातील उत्कृष्ट पाच टक्के शास्त्रज्ञांमध्ये डॉ. प्रकाश हलामी यांची निवड झाली आहे. हा सन्मान मिळवणारे ते गडचिरोली जिल्ह्यातील पहिले संशोधक ठरले आहेत. एका आदिवासी पाड्यातील मुलाने जागतिक संशोधन विश्वात स्वतःचे स्थान निर्माण करणे ही केवळ वैयक्तिक यशोगाथा नाही, तर समाजाच्या सामूहिक क्षमतेचा पुरावा आहे. सध्या ते म्हैसूर येथील सीएसआयआर-केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था (सीएफटीआरआय) येथे वरिष्ठ वैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत. सूक्ष्मजीवशास्त्र, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, अन्नसुरक्षा आणि सार्वजनिक आरोग्य या क्षेत्रात त्यांनी केलेले संशोधन देशासाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. कोविड-१९ महामारीच्या कठीण काळात चाचणी केंद्र उभारणीपासून लाखो आरटी-पीसीआर नमुन्यांच्या तपासणीपर्यंत त्यांनी दिलेले योगदान हे विज्ञान समाजाच्या सेवेसाठी कसे वापरावे, याचे उत्तम उदाहरण आहे.
डॉ. हलामी यांचे संशोधन केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित राहिले नाही. त्यांनी विकसित केलेल्या जैवतंत्रज्ञान प्रक्रियांचा उद्योग क्षेत्रात वापर होत आहे. त्यांनी विकसित केलेले संशोधन तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर वैज्ञानिक समुदायासाठी उपयुक्त ठरले आहे. त्यांच्या नावावर १५० हून अधिक संशोधन निबंध, १३०० पेक्षा अधिक संदर्भ (सिटेशन्स), २०० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमधील सादरीकरणे, तीन पुस्तके, २५ पुस्तकांमध्ये लेखन व संपादन, अनेक पीएच. डी. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, तसेच विविध पेटंट्स आणि नवकल्पनांमध्ये मोलाचे योगदान अशी उल्लेखनीय शैक्षणिक कामगिरी आहे.
जपान, जर्मनी, अमेरिका यांसारख्या देशांतील संशोधन संस्थांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना फेलोशिप आणि विविध सन्मानांनी गौरविले आहे. पण या सर्व यशामागे कोणताही चमत्कार नाही, आहे ती फक्त शिक्षणावरची निष्ठा, कठोर परिश्रम, सातत्य आणि स्वतःवरचा अढळ विश्वास. आजच्या काळात अनेक युवक यशाचा शॉर्टकट शोधतात. सोशल मीडियावरील प्रसिद्धी, झटपट यश आणि बाह्य आकर्षण यामध्ये अनेकदा खरे ध्येय हरवते. अशा वेळी डॉ. प्रकाश हलामी यांचा प्रवास तरुणांसाठी दिशादर्शक ठरतो. त्यांनी सिद्ध करून दाखवले की, परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी शिक्षण, संशोधन आणि ज्ञानाची भूक कायम ठेवली तर जगातील कोणतेही व्यासपीठ दूर राहत नाही. गडचिरोलीसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यात अनेक मुलांमध्ये अपार बुद्धिमत्ता आहे. गरज आहे ती योग्य संधी, सक्षम मार्गदर्शन आणि प्रेरणेची. डॉ. हलामी यांची यशोगाथा ही अशा हजारो विद्यार्थ्यांसाठी आशेचा किरण आहे. आपणही वैज्ञानिक होऊ शकतो, संशोधक होऊ शकतो, जगभरात आपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करू शकतो, हा आत्मविश्वास त्यांच्या कार्यामुळे नव्या पिढीमध्ये निर्माण होत आहे.
विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळा नाही, तर समाजाच्या समस्यांवर उपाय शोधण्याचे सामर्थ्य आहे. विज्ञान म्हणजे मानवतेची सेवा. डॉ. हलामी यांनी आपल्या संशोधनातून हेच तत्त्व जपले. त्यामुळे त्यांचे कार्य केवळ शैक्षणिक उपलब्धी म्हणून नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचे आदर्श उदाहरण म्हणूनही पाहिले पाहिजे.dr prakash halami आज गडचिरोली जिल्हा विकासाच्या नव्या वाटेवर आहे. शिक्षण, क्रीडा, उद्योग, आरोग्य आणि कौशल्य विकासाच्या क्षेत्रात सकारात्मक बदल घडत आहेत. अशा काळात डॉ. प्रकाश हलामी यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वांची यशोगाथा जिल्ह्याच्या नव्या ओळखीचा पाया ठरत आहे. नकारात्मक बातम्यांपलीकडेही गडचिरोलीकडे जगाला देण्यासारखी ज्ञानसंपदा आणि प्रतिभा आहे, हे त्यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. एका छोट्याशा आदिवासी पाड्यातून सुरू झालेला प्रवास आज जागतिक संशोधन विश्वापर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो-स्वप्न पाहा, शिक्षणावर विश्वास ठेवा, मेहनतीची साथ सोडू नका आणि आपल्या मातीशी नाळ कायम जोडा. डॉ. प्रकाश हलामी हे केवळ गडचिरोलीचे नव्हे, तर संपूर्ण देशाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या कार्यामुळे गडचिरोलीचे नाव देशाच्या आणि जगाच्या वैज्ञानिक नकाशावर अभिमानाने कोरले गेले आहे. अशीच अनेक स्वप्ने या मातीतून उभी राहोत आणि ज्ञान, संशोधन व कर्तृत्वाच्या बळावर गडचिरोलीचा गौरव अधिकाधिक उंचावत राहो, हीच अपेक्षा.
९९२२९९९५८८