वर्धा,
sonam-wangchuk : भारतीय लोकशाही अभियान, वर्धा यांच्या पुढाकाराने आज १६ रोजी महात्मा गांधी पुतळा परिसरात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक, शेतकरी, कामगार तसेच विविध जनसंघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जनआंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना जिल्हाधिकार्यांमार्फत निवेदन पाठविण्यात आले.
निवेदनात नमुद केल्यानुसार, जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनातील मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षांमधील कथित प्रश्नपत्रिका लीक प्रकरणांची निष्पक्ष चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, विद्याथ्र्यांच्या भविष्याशी संबंधित जबाबदारी निश्चित करणे, आदी मागण्या करण्यात आल्या.
या आंदोलनात खासदार अमर काळे, किसान अधिकार अभियानचे मुख्य प्रेरक अॅड. अविनाश काकडे, वर्धेचे नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, देवळीचे नगराध्यक्ष किरण ठाकरे, सर्व सेवा संघाचे अध्यक्ष चंदन पाल, सेवाग्राम आश्रमच्या अध्यक्ष आशा बोथरा, नयी तालीम समितीच्या सुषमा शर्मा, गांधी सेवा संघाचे अनिल फरसोले, सर्व सेवा संघाचे प्रबंधक विश्वस्त मोहम्मद शेख हुसेन, आदींसह विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.