रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा 192 देशांमध्ये डंका

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
मुंबई
raja shivaji अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता रितेश देशमुखच्या महत्त्वाकांक्षी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवल्यानंतर आता ओटीटी प्लॅटफॉर्मवरही आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांत या चित्रपटाने जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळवत नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या जागतिक क्रमवारीत तिसरे स्थान पटकावले आहे.
 

raja shivaji netflix global success | ritesh deshmukh historical blockbuster 
या यशाची माहिती नेटफ्लिक्स इंडियाने अधिकृत सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. पोस्टमध्ये, “राजा शिवाजीची गर्जना आता जगभर घुमत आहे. नेटफ्लिक्सवरील नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या जागतिक यादीत हा चित्रपट तिसऱ्या क्रमांकावर ट्रेंड करत आहे,” असे म्हटले आहे. या कामगिरीमुळे ‘राजा शिवाजी’ हा सध्या नेटफ्लिक्सवरील सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या नॉन-इंग्रजी चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
हा चित्रपट 26 जून 2026 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. प्रदर्शनानंतर अल्पावधीतच भारतासह विविध देशांतील प्रेक्षकांकडून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नेटफ्लिक्सवर स्पॅनिश, कोरियन, चिनी, थाई, इंग्रजीसह विविध भाषांतील चित्रपट आणि वेबसीरिज उपलब्ध असतानाही ‘राजा शिवाजी’ने जागतिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘राजा शिवाजी’ हा मूळचा मराठी चित्रपट असून तो हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटात रितेश देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबरोबरच दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. त्यांच्या समोर अभिनेत्री जेनेलिया देशमुख महत्त्वाच्या भूमिकेत झळकली आहे. तसेच संजय दत्त, विद्या बालन, अभिषेक बच्चन आणि फरदीन खान यांसारख्या दिग्गज कलाकारांनीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत.ओटीटीपूर्वी या चित्रपटाने थिएटरमध्येही उल्लेखनीय यश मिळवले होते. 1 मे 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या ‘राजा शिवाजी’ची निर्मिती सुमारे 75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये करण्यात आली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने सुमारे 130 कोटी रुपयांची कमाई करत मोठे व्यावसायिक यश संपादन केले. आता थिएटरमधील यशानंतर नेटफ्लिक्सवरील जागतिक नॉन-इंग्रजी चित्रपटांच्या यादीत तिसरे स्थान मिळवत ‘राजा शिवाजी’ने ओटीटी विश्वातही आपली लोकप्रियता अधोरेखित केली आहे.