राजोली हत्याकांडाचा तातडीने छडा लावून दोषींना अटक करा : डॉ. देवराव होळी

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
गडचिरोली, 
devrao-holi : धानोरा तालुक्यातील राजोली रेती घाटावर झालेल्या युवकाच्या हत्येचा तातडीने छडा लावून दोषींना अटक करावी, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष व पारदर्शक चौकशी करावी, अशी मागणी भाजपा आदिवासी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी केली आहे. तपासात कोणतीही हयगय अथवा दबाव सहन केला जाणार नसून, अन्यथा तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
 

kjk 
 
 
 
डॉ. होळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रेती घाट मालक, त्याचे भागीदार, तसेच घटनेच्या वेळी घाटावर उपस्थित असलेले कर्मचारी, सुरक्षा रक्षक, वाहनचालक आणि संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात यावी. घटनेच्या वेळी कोण उपस्थित होते, त्यांनी पोलिसांना तात्काळ माहिती दिली का आणि घटनास्थळावरील पुरावे जपण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या का, याचाही तपास व्हावा.
 
 
घटनास्थळी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांतील सर्व फुटेज तातडीने जप्त करून त्याची फॉरेन्सिक तपासणी करण्यात यावी. त्याच्या आधारे आरोपींसह त्यांना मदत करणार्‍या प्रत्येक व्यक्तीचा शोध घेऊन तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
 
 
या प्रकरणाच्या तपासाबाबत जनतेमध्ये विविध शंका उपस्थित होत असल्याचे सांगत, रेती घाटाशी संबंधित व्यक्ती किंवा इतर कोणाचीही मिलीभगत होती का, तसेच तपासात कोणत्याही स्तरावर निष्काळजीपणा अथवा अनुचित हस्तक्षेप झाला का, याचाही निष्पक्ष तपास व्हावा, असे डॉ. होळी यांनी म्हटले आहे. कोणालाही घाईघाईने क्लीन चिट न देता सर्व बाबींची कसून चौकशी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
 
 
मृत युवकाच्या कुटुंबीयांना तातडीने न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी करत, अन्यथा भाजपा आदिवासी मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील, असा इशारा डॉ. देवराव होळी यांनी दिला.