तभा वृत्तसेवा
राळेगाव,
ralegaon-nagar-panchayat : भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्लसिंह चौहान यांनी राळेगाव नगरपंचायतीच्या साडेचार वर्षांच्या कारभारावर जोरदार टीका करत नगरपंचायतीचे अपयश जनतेसमोर मांडले. शहरातील मूलभूत प्रश्न, विकासकामांतील निष्क्रियता, अमृत 2.0 नळ योजनेबाबत पसरविण्यात येत असलेला संभ्रम व नपंच्या प्रशासनातील कथित विसंगती यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडली.
अॅड. चौहान यांनी, गेल्या साडेचार वर्षांत राळेगावकरांसाठी नपंने एकही ठोस व लोकहिताचे काम केले नाही. उलट आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केवळ दोन वर्षांत शहरासाठी सुमारे 24 कोटी रुपयांची विविध विकासकामे मंजूर करून सुरू केली आहेत. शहरात क्रीडा संकुलासह विविध विकासकामे सुरू आहे. आणखी 10 कोटी रुपयांचा निधी आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शहराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
यावेळी त्यांनी अमृत 2.0 पाणीपुरवठा योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व नपंच्या 5 टक्के स्वनिधीतून सुमारे 48 कोटी रुपयांची अमृत 2.0 नळ योजना मंजूर झाली आहे. मात्र नपंतील पदाधिकारी या योजनेत अडथळा निर्माण करीत असल्याचा खोटा प्रचार करीत आहेत.
नपंच्या मागील कामकाजाचा अनुभव, कथित भ्रष्ट कारभार व दर्जाबाबत निर्माण झालेल्या शंका लक्षात घेऊन काम गुणवत्तापूर्ण व मुदतीत पूर्ण व्हावे, या एकमेव उद्देशाने मंत्री डॉ. अशोक उईके यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून कार्यवाही यंत्रणा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजीपी) कडे देण्याची मागणी केली. त्यानुसार शासनाने कार्यान्वयन यंत्रणा बदलून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे योजना सोपविली.
याच निर्णयाला विरोध करत नपं अध्यक्ष रवींद्र शेराम व उपाध्यक्ष जानराव गिरी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली, अशी माहिती चौहान यांनी दिली. राळेगाव नपंत सत्ता नेमकी शिवसेनेची आहे की काँग्रेसची? जर शिवसेनेची सत्ता असेल तर स्वतःच्या पक्षाचे नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयालाच विरोध का केला जात आहे? असा प्रश्न अॅड. चौहान यांनी उपस्थित केला.
या पत्रपरिषदेला तालुकाध्यक्ष छाया पिंपरे, नपं निवडणूक प्रभारी प्रलय टिप्रमवार, शहराध्यक्ष शुभम मुके, अभिजीत कदम, सीमा एडसकर, बाळासाहेब दिघडे, संदीप पेंदोर उपस्थित होते.