फेडच्या ‘फायनान्स मिशन’मध्ये भारतीयांचा दबदबा

राजन, चेट्टी, शर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अमेरिका
raghuram rajan अमेरिकी फेडरल रिझर्वने मौद्रिक धोरणाच्या समीक्षेसाठी पाच महत्त्वाच्या टास्क फोर्सची स्थापना केली असून त्यामध्ये तीन भारतीय वंशीय तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन, हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ राज चेट्टी आणि मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांना या टास्क फोर्समध्ये स्थान देण्यात आले आहे.
 

rbi ex governor raghuram rajan raj chetty and asha sharma join us federal reserve task forces 
फेडरल रिझर्वचे नवीन चेअरमन केविन वार्श यांनी मौद्रिक धोरण निर्मितीशी संबंधित महत्त्वाच्या क्षेत्रांचा सखोल आढावा घेण्यासाठी या टास्क फोर्सची स्थापना केली आहे. या पाच गटांमध्ये कम्युनिकेशन, बॅलन्स शीट पॉलिसी, डेटा, प्रोडक्टिविटी अँड जॉब्स तसेच इन्फ्लेशन फ्रेमवर्क या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.रघुराम राजन यांची नियुक्ती बॅलन्स शीट पॉलिसी टास्क फोर्समध्ये करण्यात आली आहे. या पॅनलमध्ये हार्वर्डचे अर्थशास्त्रज्ञ करेन डायनन आणि फेडरल रिझर्वचे माजी गव्हर्नर जेरेमी स्टीन यांचाही समावेश आहे. फेडरल रिझर्वच्या सध्याच्या बॅलन्स शीट व्यवस्थेतील खर्च आणि त्यातून मिळणारे फायदे यांचा या टास्क फोर्सकडून अभ्यास केला जाणार आहे. जागतिक अर्थव्यवस्था आणि मौद्रिक धोरणाचे तज्ज्ञ म्हणून ओळखले जाणारे रघुराम राजन या प्रक्रियेत आपल्या अनुभवाच्या आधारे योगदान देतील.
 
 
अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारा परिणाम
 
 
हार्वर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ राज चेट्टी यांची नियुक्ती डेटा टास्क फोर्समध्ये करण्यात आली आहे. या पॅनलमध्ये डग मॅकमिलन आणि शिकागो विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ केविन मर्फी यांचाही समावेश आहे. फेडरल रिझर्वच्या धोरणात्मक निर्णयांसाठी वापरण्यात येणाऱ्या आर्थिक डेटाची गुणवत्ता आणि उपलब्धतेचा वेग कसा सुधारता येईल, यावर हा गट काम करणार आहे.राज चेट्टी हे रिअल-टाइम आणि प्रशासकीय डेटाचा वापर करून आर्थिक गतिशीलता, असमानता आणि कामगार बाजाराचा अभ्यास करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे डेटा विश्लेषणाच्या क्षेत्रातील त्यांचा अनुभव फेडरल रिझर्वच्या धोरणनिर्मितीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.मायक्रोसॉफ्टच्या कार्यकारी अधिकारी आशा शर्मा यांची नियुक्ती प्रोडक्टिविटी अँड जॉब्स टास्क फोर्समध्ये करण्यात आली आहे. या पॅनलमध्ये मार्क एंड्रीसन आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे अर्थशास्त्रज्ञ चार्ल्स आय. जोन्स यांचाही समावेश आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तसेच नव्या पिढीतील जनरल पर्पज टेक्नोलॉजीजचा अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारा परिणाम या टास्क फोर्सकडून अभ्यासला जाणार आहे.फेडरल रिझर्वच्या या उपक्रमामुळे जागतिक अर्थव्यवस्था, तंत्रज्ञान, रोजगार आणि चलनविषयक धोरण या क्षेत्रातील तज्ज्ञांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या प्रक्रियेत भारतीय वंशाच्या तज्ज्ञांची भूमिका विशेष महत्त्वाची ठरणार आहे.