तभा वृत्तसेवा
वणी,
cattle-smuggling : तालुक्यातील डोर्ली येथे बजरंग दलाचे सक्रिय कार्यकर्ते व गोरक्षक अक्षय प्रशांत मालेकर यांच्यावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
गोतस्करीविरोधात यापूर्वी केलेल्या कारवाईचा राग मनात धरून आरोपींनी त्यांच्यावर दगड तसेच लाथाबुक्क्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. या घटनेत अक्षय मालेकर गंभीर जखमी झाले असून, घटनास्थळी उपस्थित मजुरांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी शिरपूर पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय मालेकर हे अनेक वर्षांपासून बजरंग दलाशी संलग्न असून परिसरात गोरक्षणाचे काम करतात. त्यांनी यापूर्वी अनेक वेळा गोतस्करी करणारी वाहने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वीही त्यांनी इतर गोरक्षकांच्या मदतीने गोतस्करी करणारे एक वाहन पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर संबंधितांकडून बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परांविरोधात तक्रारी दाखल झाल्याचीही माहिती आहे.
मंगळवारी अक्षय मालेकर हे डोर्ली येथील पाण्याच्या टाकीजवळ सुरू असलेल्या कामावर टाटा एस वाहनाचे चालक म्हणून गेले होते. दुपारच्या सुमारास ते मजुरांसोबत बसलेले असताना आरोपींनी अचानक त्यांच्यावर हल्ला चढविल्याचा आरोप आहे. तुम्ही वणीमध्ये आमच्या गाड्या पकडून देता, असे म्हणत आरोपींनी दगडाने तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या हल्ल्यात मालेकर गंभीर जखमी झाले. मात्र, उपस्थित मजुरांनी तातडीने हस्तक्षेप केल्याने आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
अक्षय मालेकर यांच्या तक्रारीवरून शिरपूर पोलिसांनी भोलाराम सुरेश पडोळे (32), लुकेश सुरेश पडोळे (27), आदित्य रामचंद्र आस्वले (20), तिघे रा. डोर्ली, तसेच आकाश लेनगुरे (30), रा. शिरपूर यांच्याविरुद्ध भान्यासं कलम 118, 352 व 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर पोलिस करीत आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी विविध स्तरांतून करण्यात येत आहे. आरोपींकडून झालेल्या हल्ल्याचे आरोप फिर्यादीत नमूद असून, या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास पोलिस करीत आहेत.