मिलिट्रीच्या सेवानिवृत्तअधिकाऱ्याला केले डिजीटल अरेस्ट

१७.२० लाखांची फसवणूक

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
digitally arrested राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) अंमलबजावणी संचालनालय (ईडी), भारतीय रिझर्व्ह बँक आणि डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियाचे अधिकारी असल्याचे भासवून सायबर गुन्हेगारांनी ७७ वर्षीय निवृत्त मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या अधिकाऱ्याची १७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केली. ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली मानसिक दबाव टाकून आरोपींनी त्यांची निवृत्तीची संपूर्ण बचत परस्पर वळती केली. वसंत सीतारामजी धामंदे (७७, रा. स्वराज अपार्टमेंट, स्वराजनगर, पार्वतीनगर) असे फसवणूक झालेल्या निवृत्त अधिकाऱ्याचे नाव आहे.
 

digitally arrested  
मिळालेल्या माहितीनुसार, सायबर आरोपींनी ३१ मार्च ते ७ एप्रिल २०२६ या कालावधीत विविध मोबाइल क्रमांकांवरून मिल्ट्रीमध्ये अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या धामंदे यांच्याशी संपर्क केला. आपण डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया, एनआयए आणि अन्य सरकारी यंत्रणांचे अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले. एका आरोपीने स्वतःची ओळख मुंबईतील कुलाबा येथील संदीप रॉय अशी करून दिली, तर दुसऱ्याने आपण एनआयए अधिकारी प्रदीप जयस्वाल असल्याचे सांगितले.
तुमच्या नावावर सिमकार्ड घेण्यात आले असून त्याचा वापर गुन्हेगारी कारवायांसाठी झाल्याचा खोटा दावा आरोपींनी केला. त्यानंतर व्हॉट्सॲपवर बनावट ईडी वॉरंट आणि खोटी अधिकृत कागदपत्रे पाठवून बँक खात्यांची आरबीआय व ईडी कडून पडताळणी करण्यात येणार असल्याचे सांगितले.
आरोपींनी सतत फोन करून धामंदे यांच्यावर मानसिक दबाव निर्माण केला. तपास यंत्रणांच्या कारवाईची भीती दाखवत त्यांना ‘डिजिटल अरेस्ट’मध्ये असल्याचे भासवले. आरोपींच्या सांगण्यावर विश्वास ठेवून धामंदे यांनी आपल्या एसबीआय खात्यातील निवृत्तीची बचत आरटीजीएसद्वारे दुसऱ्या बँक खात्यात हस्तांतरित केली. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(क) आणि ६६(ड) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. ‘कोणतीही सरकारी यंत्रणा डिजिटल अरेस्ट करत नाही किंवा खाते पडताळणीच्या नावाखाली पैसे हस्तांतरित करण्यास सांगत नाही. अशा प्रकारचे फोन आल्यास तत्काळ संपर्क तोडून सायबर पोलिसांशी संपर्क साधावा,’ असे आवाहन पोलिसांनी केले आहे.