वर्धा,
rotha-atrocit-murder-case : चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बुधवारी सावंगी पोलिस ठाण्यांतर्गत येणार्या रोठा शिवारात घडली. या घटनेने जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून नागरिकांमध्ये मोठा आक्रोश आहे. दरम्यान, पोलिसांनी ताबडतोब कारवाई करीत संशयित तिघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तसेच आरोपीला पकडण्यासाठी १४ पथकं तयार करण्यात आली असून तांत्रिक माहितीसाठी यातीलच दोन वेगळ्या पथकाची नियुती करण्यात आली होती. मात्र, संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी राहुल मडावी (३०) रा. रोठा हा मजूरच नराधम निघाल्याची माहिती पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना दिली.
रोठा शिवारात बुधवारी १२ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची धकादायक घटना घडली. सावंगी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. गुन्हा नोंद करून गुन्ह्याचा तपास शहर पोलिस ठाण्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडीक यांच्याकडे देण्यात आला. फॉरेन्सिक टिम, सायबर आणि श्वान पथकाने घटनास्थळाची माहिती घेऊन आवश्यक ते सॅम्पल गोळा केले. स्थानिक पोलिस, गुन्हे शाखेचे पथक आणि विभागातील जवळपास १४ पथकं तयार करण्यात आली होती. घटनास्थळाजवळ किती मोबाईल ट्रेस होतात, यासाठी तांत्रिक माहिती मिळवण्यासाठी वेगळे दोन पथकं तयार करण्यात आले होते. पोलिसांना काही माहिती मिळाली असून यावर काम सुरू होते. या माहितीच्या आधारे कसून चौकशी सुरू होती. या प्रकरणात उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडीक यांच्या नेतृत्त्वात एसआयटी तयार करण्यात आली. त्यांच्यासोबत विशेष १० लोकांची चमू देण्यात आली होती. अशातच पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. दरम्यान, पोलिस खाया दाखविताच संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या तिघांपैकी राहुल मडावी पोपटासारखा बोलू लागला. गुन्ह्याची कबुलीही त्याने दिली.
पीडित मुलीचे कुटुंबीय ज्या शेतात सालगडी म्हणून काम करीत होते त्याच शेताच्या बाजूच्या एका शेतात नराधम राहुल मडावी हा मजूर म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याचे नेहमीच पीडित कुटुंबाच्या झोपडीत येणे-जाणे असायचे. बुधवारी सुद्धा तो पीडित कुटुंबाच्या झोपडीत गेला असता मुलगी एकटी असल्याचे पाहून त्याने हा प्रकार घडवून आणल्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी सांगितले. सध्या त्याच्यावर पोसोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. लवकरच त्याला कोर्टात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करू. मृत मुलीचा शवविच्छेदन अहवाल आणि आरोपीचा मेडिकल रिपोर्ट आल्यानंतरच हे प्रकरण स्पष्ट होणार असल्याचेही अग्रवाल यांनी सांगितले.