‘त्या’ चिमुकलीचे ‘ऑन कॅमेरा’ शवविच्छेदन

रोठा शिवारातील अत्याचार आणि खून प्रकरण

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
वर्धा, 
rotha-rape-murder-case : काळजाचा ठोका चुकविणारी घटना वर्धेलगतच्या रोठा शिवारात बुधवार १५ रोजी घडली. १२ वर्षीय चिमुकलीवर पाशवी अत्याचार करून दगडाने ठेचून निर्घुण खून करण्यात आला. या घटनेने जिल्ह्यात संतापाचे वातावरण असून एखादा विकृत कोणत्या पातळीवर जाऊ शकते याची प्रचिती वर्धेकरांनी पहिल्यांदाच अनुभवली. दरम्यान, आज गुरुवार १६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात चिमुकलीच्या पार्थिवावर ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले.
 
 
 
jkj
 
 
 
शहरालगत असलेल्या रोठा शिवारात वर्धेतील कावळे यांच्या शेतात भंडारा जिल्ह्यातील एक कुटुंब कामाला आहे. कुटुंबात पती-पत्नी आणि तीन मुली असे पाच जण राहत होते. तिन्ही मुली रोठा येथील शाळेत शिकत आहेत. दरम्यान, १५ रोजी पती-पत्नी शहरात आले तर तिन्ही मुली शाळेत गेल्या होत्या. दरम्यान, पीडित मुलगी शाळेतून लवकर आली. शाळेचा गणवेश बदलवित असतानाच अज्ञात विकृताने तिच्या शरीराचे लचके तोडले. घटना कुणालाही कळू नये म्हणून अत्याचारानंतर चिमुकलीला दगडाने ठेचून तिचा खून केला. आई-वडील घरी आल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. घटनास्थळावरून रक्तमिश्रीत माती, रक्ताचे नमुने, हत्येसाठी वापरण्यात आलेला दगड जप्त करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले. अज्ञातावर पोस्को, अत्याचार करून खून करणे आदी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयात चिमुकलीच्या पार्थिवावर ऑन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आले. परिसरात तणावाचे वातावरण होते. सावंगी मेघे पोलिस ठाणे, रामनगर आणि शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी-कर्मचारी, गुन्हे शाखेचे दोन पथक, एटीएस आणि एसआयटीची चमू, आदिवासी विकास महामंडळाचे अधिकारी, समाजकल्याण विभागाचे विशेष पथक, रुग्णालयातील तीन डॉक्टरांचे विशेष पथक यांच्या उपस्थितीत मुलीवर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मुलीचे शव तिच्या मूळ गावी भंडारा येथे अन्त्यविधीसाठी रवाना होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, खा. अमर काळे, आमदार समीर कुणावार तसेच सामाजिक कार्यकत्र्यांनी रुग्णालय परिसरात भेटी देऊन पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. काही सामाजिक संघटनांनी रुग्णालयाच्या रस्त्यावर जवळपास ३ तास रस्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला. त्यामुळेे सायंकाळपर्यंत या रस्त्यावरील वाहतूक शहरातून वळवण्यात आली होती.
प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार
 
 
शवविच्छेदन सुरू असतानाच जिल्हा रुग्णालयासमोर काही सामाजिक संघटना तसेच गावकर्यांनी गर्दी करून रास्ता रोको केला. आरोपीला अटक करून प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, तसेच नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांचा आक्रोश बघता हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यासाठी पाच जणांची समिती गठित करण्यात येणार असल्याची माहिती आहे.