वर्धा,
turbid-water-supply : शहरालगतच्या साटोडा परिसरात गेल्या काही दिवसांपासून दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जीवन प्राधिकरणची योजना हा एकमेव पर्याय असलेल्या या परिसरात शेकडो कुटुंबांना अस्वच्छ पाणी वापरावे लागत आहे. त्या या परिसरात अतिसार, ताप, उलट्या आदी आजार होऊ लागले आहेत.
जीवन प्राधिकरणकडून पुरविण्यात येणारे पाणी इतके गढूळ आहे, की ते पातेल्यात किंवा पारदर्शक बाटलीत भरल्यानंतर त्यातील गाळ स्पष्टपणे दिसून येतो. अशा पाण्याचा वापर पिण्यासाठी तसेच स्वयंपाकासाठी करणे धोकादायक ठरत असून, अनेक कुटुंबांना आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. परिसरात दूषित पाण्यामुळे आजारांची साथ पसरल्याचे चित्र असून, अनेक घरांमध्ये एकाचवेळी दोन ते तीन सदस्य आजारी पडल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
यासंदर्भात अनेकवेळा जीवन प्राधिकरणकडे तक्रारी करूनही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणीपुरवठा यंत्रणेची तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करावी व शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
जीवन प्राधिकरण पाणीपुरवठ्यासाठी नियमित आणि मोठ्या प्रमाणात देयक आकारते. मात्र, त्या बदल्यात शुद्ध पाणी पुरविण्याची जबाबदारी पार पाडण्यात प्राधिकरण पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचे गावकर्यांचे म्हणणे आहे.