सेलू,
robberies : सेलू शहरात बुधवारी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत दोन घरांवर धाडसी दरोडे टाकले. यात १ लाख ९२ हजाराची रोकड व सोन्या चांदीचे दागिणे लंपास केले. या घटनेची सेलू पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेहेरबाबा मंदिर परिसरातील रहिवासी विनोद जगदाळे यांच्या घरी कोणी नसताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील सर्व खोल्यांतील कपाटे व साहित्य अस्ताव्यस्त फेकून दिले. सकाळी भाडेकरूच्या निदर्शनास तुटलेले कुलूप आल्यानंतर त्यांनी घरमालक व पोलिसांना माहिती दिली. या घरातून नेमका किती ऐवज चोरीस गेला, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. याच रात्री शहरातील गजानन फटिंग यांच्या घरावरही चोरट्यांनी हात साफ केला. येथे १ लाख ९२ हजारांची रोकड तसेच सुमारे ९ ग्रॅम वजनाची सोन्याची नथ चोरट्यांनी लंपास केल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली असून फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथक घटनास्थळी दाखल होऊन पुरावे संकलित केले. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पथके कार्यरत आहेत.
एका रात्रीत सलग दोन घरांवर दरोडे पडल्याने सेलू शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात रात्रीची पोलीस गस्त वाढवावी, चोरट्यांचा तातडीने बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.