खैबर पख्तुनख्वात दहशतीचा स्फोट; ३ पोलिस ठार, ३४ जखमी

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
पेशावर,
terror in Khyber Pakhtunkhwa पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा प्रांतात बुधवारी झालेल्या दोन स्वतंत्र दहशतवादी हल्ल्यांमध्ये तीन पोलिसांचा मृत्यू झाला, तर ३४ जण जखमी झाले. लोअर दिर आणि बन्नू जिल्ह्यात घडलेल्या या घटनांनंतर सुरक्षा यंत्रणांनी परिसराचा ताबा घेत व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे.पहिला हल्ला लोअर दिर जिल्ह्यातील हैदर परिसरातील लाडम टॉपजवळ झाला. पोलिसांचा ताफा तेथून जात असताना दहशतवाद्यांनी प्रथम हँड ग्रेनेड फेकले आणि त्यानंतर स्वयंचलित शस्त्रांनी अंधाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तीन पोलिसांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर १९ पोलीस जखमी झाले. हल्लेखोरांनी पोलिसांची दोन वाहनेही जाळून टाकली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतर अधिक माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.
 

khaiber 
 
 
दुसरी घटना बन्नू जिल्ह्यातील मिरियन पोलीस ठाण्यात घडली. दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन पोलीस ठाण्यात घुसवून आत्मघाती हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षा दलांनी वेळीच कारवाई करत वाहन पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच गोळीबार करून ते नष्ट केले. त्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यात घुसण्याचा प्रयत्न केला, मात्र सुरक्षा दलांनी त्यांचा हल्ला परतवून लावत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला.या चकमकीत १५ पोलीस जखमी झाले असून, त्यापैकी १० जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी पेशावर येथे हलवण्यात आले आहे. बन्नूचे जिल्हा पोलीस अधिकारी कॅप्टन मोहम्मद फुरकान बिलाल यांनी या घटनेला दुजोरा देत परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगितले. मृत आणि जखमींबाबतची सविस्तर माहिती पडताळणीनंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
दोन्ही घटनांनंतर मोठ्या प्रमाणात पोलीस आणि इतर सुरक्षा दल घटनास्थळी दाखल झाले असून संपूर्ण परिसर सील करून हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. याच वर्षी एप्रिल महिन्यातही बन्नूमधील डोमेल पोलीस ठाण्यावर आत्मघाती कार बॉम्ब हल्ला झाला होता. त्या हल्ल्यात किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १३ जण जखमी झाले होते. त्यामध्ये एका पोलिसाचाही समावेश होता. सध्याच्या ताज्या हल्ल्यांमुळे खैबर पख्तुनख्वातील सुरक्षा परिस्थिती पुन्हा एकदा गंभीर बनली आहे.