मुंबई
toxic केजीएफ स्टार यशच्या मुख्य भूमिकेतील ‘टॉक्सिक’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि क्रेझ निर्माण झाली आहे. सुरुवातीला हा चित्रपट ‘धुरंधर 2’सोबत थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. मात्र संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्मात्यांनी त्याचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आता ‘टॉक्सिक’ची वाढती लोकप्रियता लक्षात घेता अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या बहुचर्चित ‘ईठा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेबाबतही निर्माते महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या विचारात असल्याची माहिती समोर आली आहे.
‘टॉक्सिक’ या चित्रपटाविषयी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू असून त्याबद्दल प्रेक्षकांमध्ये तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, थिएटरमध्ये हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरण्याची दाट शक्यता आहे. मात्र याच काळात प्रदर्शित होणाऱ्या इतर चित्रपटांसाठी ही परिस्थिती आव्हानात्मक ठरू शकते.
श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘ईठा’ हा बायोपिक येत्या 28 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध तमाशा आणि लावणी कलाकार विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. दुसरीकडे, यशचा ‘टॉक्सिक : अ फेरीटेल फॉर ग्रोन अप्स’ हा चित्रपट 26 ऑगस्ट रोजी जगभरात प्रदर्शित होणार आहे.
‘बॉलिवूड हंगामा’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘टॉक्सिक’सोबत थेट बॉक्स ऑफिस संघर्ष टाळण्यासाठी ‘ईठा’च्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा पर्याय निर्माते गांभीर्याने विचारात घेत आहेत. त्यानुसार, हा चित्रपट ‘टॉक्सिक’च्या प्रदर्शनापूर्वी किंवा त्यानंतर काही दिवसांनी प्रदर्शित करण्याबाबत चर्चा सुरू आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा येत्या काही दिवसांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चित्रपट व्यापार विश्लेषकांच्या मते, दोन्ही चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करण्याची क्षमता असून ते एकाच वेळी प्रदर्शित झाल्यास त्याचा फटका एखाद्या एका चित्रपटाला किंवा दोन्ही चित्रपटांना बसू शकतो.
‘ईठा’चे दिग्दर्शन ‘छावा’ फेम toxic लक्ष्मण उतेकर यांनी केले असून या चित्रपटाच्या टीझरमधील श्रद्धा कपूरचा लूक आणि कथानकाने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधले आहे. या चित्रपटात विठाबाई भाऊ मांग नारायणगांवकर यांचा 1940 ते 1990 या कालखंडातील प्रवास उलगडण्यात येणार असून त्यांच्या संघर्षापासून यशापर्यंतचा प्रवास प्रभावीपणे चित्रित करण्यात आला आहे. दरम्यान, यशची मुख्य भूमिका असलेला ‘टॉक्सिक’ हा चित्रपट त्याच्या बिग बजेट, कलाकारांची फळी आणि भव्य दृश्यांमुळे आधीपासूनच चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने यश आणि कियारा अडवाणी ही जोडी प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र झळकणार आहे.