मुंबई
arnala beach विरार येथील अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या चार मुलांपैकी दोन मुलांना स्थानिक नागरिक आणि लाईफ गार्ड यांच्या मदतीने वाचवण्यात यश आले असून, अन्य दोन मुलांचा अद्याप शोध सुरू आहे. गुरुवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. समुद्र खवळलेला असून भरतीमुळे शोध मोहिमेत अडथळे निर्माण होत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी सुमारे पावणे दहाच्या सुमारास दहा ते बारा वर्षे वयोगटातील काही मुले अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर खेळण्यासाठी गेली होती. यावेळी जोरदार समुद्री लाटांच्या तडाख्यामुळे ही मुले समुद्राच्या पाण्यात ओढली गेली. किनाऱ्यावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा केल्यानंतर स्थानिक मच्छीमार आणि लाईफ गार्ड यांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. यावेळी दोन अल्पवयीन मुलांना वाचवण्यात यश आले, मात्र त्यांचे दोन साथीदार जोरदार लाटांमध्ये वाहून गेल्याचे सांगण्यात येत आहे.
समुद्रात बुडालेल्या मुलांची नावे शोएब झाकीर अहमद खान (वय १७) आणि आयन झाकीर हुसेन मंडळ (वय १९) अशी असून, त्यांचा शोध सुरू आहे. दोन्ही मुले नालासोपारा येथील असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या शोधासाठी अर्नाळा पोलीस, जीव रक्षक, होमगार्ड आणि अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने शोध मोहीम राबवण्यात येत आहे.गुरुवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर पोहण्यासाठी गेलेली ही चार अल्पवयीन मुले खोल समुद्रात उतरली होती. समुद्राला भरती असल्याने लाटांच्या जोरामुळे ही मुले आत ओढली गेली. या मुलांच्या आरडाओरडीनंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर किनाऱ्यावर गस्त घालणारे अर्नाळा पोलीस, होमगार्ड, जीव रक्षक आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने समुद्रात उतरून शोधकार्य सुरू केले. यामध्ये दोन मुलांना वाचवण्यात यश आले, तर दोन मुले भरतीच्या प्रवाहात वाहून गेली.नालासोपारा पश्चिम येथील सखर मोहल्ला परिसरातील ही चार मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. समुद्रकिनाऱ्यावर धोकादायक परिस्थितीत आत जाऊ नये, यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी सूचना फलक लावून नागरिकांना आवाहन केले आहे. मात्र, तरीही तरुण आणि मुले समुद्रात खोलवर जात असल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे.
दरम्यान, समुद्राला भरती असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत असून ओहोटीपर्यंत शोधकार्य थांबवण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्यांनी रात्रीपर्यंत मुलांचा शोध लागेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.