तभा वृत्तसेवा
उमरखेड,
clean-water-scheme : शहरातील सुमारे 60 हजार नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी मंजूर करण्यात आलेली 78 कोटी रुपयांची महत्त्वाकांक्षी शुद्धजल योजना निधीअभावी रखडली असून, कामाचा निर्धारित कालावधी संपूनही प्रकल्प अद्याप पूर्णत्वास पोहोचलेला नाही.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती राज्यस्तरीय नगरोथान महाअभियान अंतर्गत 2022 मध्ये या योजनेस मंजुरी देण्यात आली होती. वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आगामी 30 वर्षांची गरज विचारात घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत इसापूर धरणातून उमरखेड शहराला दररोज सुमारे 95 लाख लिटर शुद्ध पाणी पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी इसापूर धरण ते उमरखेड या 24 किलोमीटर अंतरावर पाईपलाईन टाकण्यात येत आहे. धरणावर उपसा विहीर, पूल, पंपगृह व इतर आवश्यक सुविधा उभारण्यात येत आहेत.
या कामासाठी निविदेनुसार 78 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. काम पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र मंजुरीनंतर अडीच वर्षांचा कालावधी उलटूनही योजना अपूर्णच आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार 30 एप्रिलपर्यंत 24 किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. इसापूर धरणावरील उपसा विहीर, पूल व संबंधित कामेही मोठ्या प्रमाणात पूर्ण झाली आहेत. या प्रकल्पाचे काम मराठवाड्यातील नांदेड येथील कंत्राटदार एजन्सीकडून करण्यात येत आहे.
पाणीपुरवठा विभागाच्या माहितीनुसार या योजनेसाठी राज्य शासनाकडून आतापर्यंत 37.5 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यापैकी कंत्राटदारास सुमारे 58 टक्के रक्कम अदा करण्यात आली आहे. प्रत्यक्ष कामाची प्रगती 75 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. मात्र पुढील निधी उपलब्ध न झाल्याने उर्वरित काम ठप्प झाले आहे. या महत्त्वाच्या योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून देऊन उर्वरित काम पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत असहे.
उमरखेड शहरातील 60 हजार नागरिकांना 2055 पर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी ही दीर्घकालीन योजना तयार करण्यात आली आहे. राज्य शासनाकडून आतापर्यंत 37.5 कोटी रुपये प्राप्त झाले आहे. कामाची प्रगती 75 टक्के झाली असली तरी पुढील निधी उपलब्ध नसल्याने काम थांबले आहे.
- संदेश मोरे
पाणीपुरवठा अभियंता
नागरिकांना शुद्धजल पाणी पुरवठा लवकर व्हावा हा मानस असुन, संबधीत कंत्राटदार यांनी ठराविक कालावधीत काम पुर्ण करावी. निधी मिळवून घेण्यासाठी संबधीत विभाकडे पाठपुरावा सुरु आहे.
- तेजश्री जैन
नगर परिषद अध्यक्ष, उमरखेड