मतदार यादी त्रुटीमुक्त करण्यासाठी राजकीय पक्षांनी सक्रिय सहभाग नोंदवावा : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

    दिनांक :16-Jul-2026
Total Views |
वाशीम,
washim collector लोकशाही व्यवस्थेचा पाया असलेली मतदार यादी अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक असणे अत्यंत आवश्यक आहे. कोणताही पात्र मतदार यादीतून वंचित राहू नये, यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी सकारात्मक भूमिका घेत सक्रिय सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले.
 
 
 

washim collector urges political parties to support error free voter list revision drive 2026
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ‘मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वमान्य राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती, त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत पुनरीक्षण प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला, तसेच आगामी विविध टप्प्यांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी विरेंद्र जाधव व सहायक महसूल अधिकारी निवडणूक रवि महाले उपस्थित होते. तसेच विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींमध्ये युवक काँग्रेस अध्यक्ष नयन कर्‍हे, काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस उज्ज्वल देशमुख, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे जिल्हाध्यक्ष बालाजी वानखेडे, तालुका संघटक आनंदा काळे व प्रतिनिधी गणेश इंगोले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष पवन राऊत, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय खानझोडे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष आकाश लोलप, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय रणखांब तसेच आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी राम पाटील डोरले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कुंभेजकर म्हणाले की, सध्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन गणना प्रपत्रांचे वितरण व संकलन करीत आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह ही प्रपत्रे वेळेत भरून द्यावीत. तसेच, राजकीय पक्षांनी आपल्या बूथ लेव्हल एजंट यांच्या माध्यमातून मतदार यादीतील नावे, तपशील आणि आवश्यक दुरुस्तींची पडताळणी करून प्रशासनाशी समन्वय ठेवावा, जेणेकरून अंतिम मतदार यादी अधिक विश्वासार्ह व अचूक होईल.
 
 
जिल्ह्यातील मतदार पुनरीक्षण मोहीमजिल्ह्यात एकूण मतदार संख्या १० लाख १९ हजार ५१९ असून, ८ लाख ५५ हजार ८३७ गणना प्रपत्रे वितरीत झाली आहे. याकामासाठी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी ४२, पर्यवेक्षक १०३, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी १,१०० नियुक्त करण्यात आले आहे.
तक्रारी आणि सूचनांवर तातडीने कार्यवाही बैठकीत विशेष सखोल पुनरीक्षणाचे वेळापत्रक, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे, दावे व हरकती स्वीकारणे आणि अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची संपूर्ण प्रक्रिया सादर करण्यात आली. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी विविध सूचना मांडल्या. त्यावर सकारात्मक चर्चा करून जिल्हाधिकार्‍यांनी संबंधित अधिकार्‍यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी दिले. लोकशाही बळकट करण्यासाठी मतदार यादीची शुद्धता आणि अचूकता अत्यंत महत्त्वाची आहे. प्रशासन, राजकीय पक्ष, बूथ लेव्हल एजंट आणि नागरिक यांच्या संयुक्त समन्वयातून ही विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम यशस्वी करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुंभेजकर यांनी यावेळी केले.
छायाचित्र - बैठकीला संबोधीत करताना जिल्हाधिकारी