भारतीय नौदलाच्या ताफ्यात आणखी एक MH-60R सीहॉक

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
mh 60r seahawk भारतीय नौदलाची ताकद वाढवण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलत अमेरिकेने भारताला आणखी एक MH-60R सीहॉक नौदल हेलिकॉप्टर सुपूर्द केले आहे. भारतातील अमेरिकी दूतावासाने शुक्रवारी याबाबत माहिती देत, हे हेलिकॉप्टर गेल्या आठवड्यात कोची येथे भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाल्याचे सांगितले.
 
mh 60r seahawk
 
अमेरिकी दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वरील पोस्टमध्ये सांगितले की, लॉकहीड मार्टिन कंपनीने तयार केलेले हे अत्याधुनिक हेलिकॉप्टर भारत-अमेरिका संरक्षण सहकार्य अधिक मजबूत होत असल्याचे प्रतीक आहे. याच आठवड्यात आणखी दोन MH-60R सीहॉक हेलिकॉप्टर भारतात दाखल होणार असल्याची माहितीही दूतावासाने दिली आहे.
 
समुद्री सुरक्षा, पाणबुडीविरोधी मोहिमा, पृष्ठभागावरील युद्धनौकांवर लक्ष ठेवणे आणि सागरी गस्त यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांसाठी MH-60R सीहॉक हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. अत्याधुनिक रडार, सेन्सर्स आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले हे हेलिकॉप्टर भारतीय नौदलाची कार्यक्षमता अधिक मजबूत करण्यास मदत करणार आहे. यापूर्वी 'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेदरम्यानही या हेलिकॉप्टरने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते.
 
दरम्यान, डिसेंबर २०२५ मध्ये भारताने MH-60R हेलिकॉप्टर ताफ्याच्या देखभाल पॅकेजसाठी महत्त्वाच्या करारावर स्वाक्षरी केली होती. त्याआधी भारतीय संरक्षण मंत्रालयाने २४ MH-60R सीहॉक हेलिकॉप्टरांच्या खरेदीसाठी सुमारे ₹७,९९५ कोटी (अंदाजे ९४६ दशलक्ष अमेरिकी डॉलर) किमतीच्या कराराला मंजुरी दिली होती. या नव्या सुपूर्दगीमुळे भारत-अमेरिका संरक्षण भागीदारी आणखी मजबूत होत असून, भारतीय नौदलाच्या सागरी सुरक्षा क्षमतेतही महत्त्वाची भर पडणार असल्याचे मानले जात आहे.