अनुराग कुमार दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Anurag Kumar is the new Police Commissioner of Delhi. दिल्ली पोलिसांच्या नेतृत्वात मोठा प्रशासकीय बदल करण्यात आला असून, पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी १९९४ बॅचचे एजीएमयूटी केडरचे आयपीएस अधिकारी अनुराग कुमार यांची दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीचे आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत.अनुराग कुमार हे सध्या इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) मध्ये विशेष संचालक म्हणून कार्यरत होते. केंद्र सरकारचे अवर सचिव राकेश कुमार सिंह यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, अनुराग कुमार पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून पुढील आदेश येईपर्यंत दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून काम पाहतील.
 
 

anurag 
दरम्यान, विद्यमान पोलीस आयुक्त सतीश गोलचा यांना पुढील नियुक्तीसाठी दिल्लीच्या नायब राज्यपालांकडे हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गोलचा यांनी २२ ऑगस्ट २०२५ रोजी दिल्ली पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यापूर्वी ते तिहार कारागृहाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. सतीश गोलचा यांचा कार्यकाळ अद्याप शिल्लक असतानाच हा निर्णय घेण्यात आल्याने प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मात्र, त्यांच्या बदलीमागील नेमके कारण अद्याप अधिकृतपणे स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे या बदलामागील कारणांबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, याबाबत अधिक माहिती येत्या काही दिवसांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.