३ महिन्यांत १.७५ लाख नवीन ई-कार्ड
नागपूर,
ayushman bharat केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजना - आयुष्मान भारत अंतर्गत नागपूर जिल्ह्यात मोठी प्रगती झाली आहे. गोरगरिबांना दर्जेदार आरोग्यसेवा मोफत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरूअसलेल्या या योजनेत जिल्ह्यातील १९ लाख ८८ हजार ४८३ लाभार्थी पात्र ठरले आहेत.
३ महिन्यांत १ लाख ७५ हजार नवीन जोडणी
गत तीन महिन्यात जिल्हा प्रशासनाने विशेष मोहीम राबवून १ लाख ७५ हजार ९५६ नवीन लाभाथ्र्यांची नोंदणी पूर्ण केली. त्यांचे आयुष्मान भारत ई-कार्ड काढण्यात आले. यामुळे आता या कुटुंबांना कोणत्याही गंभीर आजारावर दरवर्षी प्रति कुटुंब ५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार घेता येणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एकत्रितपणे काम करून हे उद्दिष्ट साध्य केले.
नेतृत्वाचे अभिनंदन
जिल्ह्याच्या या कामगिरीची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात सुरू असलेल्या लोककल्याणकारी योजनांमध्ये नागपूर जिल्ह्याने महत्त्वाचे योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी आणि आयुष्मान भारत योजनेच्या सर्व अधिकारी-कर्मचार्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले. अधिकाधिक पात्र लोकांपर्यंत ही योजना पोहोचवावी.‘
योजनेचे फायदे काय?
-५ लाखांपर्यंत मोफत उपचार : शस्त्रक्रिया, दवाखान्यातील दाखल, औषधे यांचा समावेश
-देशभरातील पॅनेल रुग्णालयात सुविधा : सरकारी + खाजगी रुग्णालयात कॅशलेस उपचार
-आर्थिक संरक्षण : आजारपणामुळे कुटुंबावर आर्थिक बोजा पडणार नाही
कोण पात्र आहे?
ग्रामीण आणि शहरी भागातील सामाजिक-आर्थिक जनगणना २०११ च्या निकषांनुसार पात्र कुटुंबे, वृद्ध, दिव्यांग आणि इतर दुर्बल घटक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पात्र लाभार्थींनी जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा महा-ई-सेवा केंद्रात जाऊन ई-कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.