'हो' ऐवजी 'नाही' म्हणाली...अन् गमावला जीव!

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
बंटवाल (कर्नाटक),
Bantwal KSRTC bus stand murder दक्षिण कन्नड जिल्ह्यातील बंटवाल येथील केएसआरटीसी बसस्थानकात २१ वर्षीय तरुणीची भरदिवसा धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. लावण्या बाळप्पा गौडा असे मृत तरुणीचे नाव असून ती काक्यपडवूजवळील कोडंगे येथील रहिवासी होती. कल्लाडका येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये ती कार्यरत होती. या प्रकरणी २२ वर्षीय चेतन हा मुख्य संशयित असून त्याचा शोध सुरू आहे.प्राथमिक तपासानुसार, चेतन हा लावण्याचा दूरचा नातेवाईक होता. तो तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता आणि काही दिवसांपासून तिचा पाठलाग करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेच्या दिवशी लावण्या काक्यपडवूकडे जाणाऱ्या केएसआरटीसी बसमध्ये चढली असताना चेतनही तिच्या मागोमाग बसमध्ये चढला. बसमध्ये असताना लावण्याने एका नातेवाईकाला फोन करून तिच्या शेजारी एक तरुण बसल्याची माहिती दिली होती.
 
 
 
Bantwal KSRTC bus stand murder
 
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, चेतनने यापूर्वी लावण्याला लग्नाचा प्रस्ताव दिला होता. तसेच तिच्यासोबत बाहेर फिरण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, लावण्याने त्याचा प्रस्ताव नाकारल्यामुळे तो संतप्त झाला होता. बसमध्ये त्याने बॅगेतून धारदार चाकू बाहेर काढल्याचे सांगितले जात आहे. यामुळे घाबरलेली लावण्या बसमधून उतरून जीव वाचवण्यासाठी पळू लागली.प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, चेतनने तिचा पाठलाग करत बसस्थानक परिसरात गाठले आणि तिच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या लावण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.या घटनेचा व्हिडिओ एका प्रत्यक्षदर्शीने मोबाईलमध्ये चित्रीत केला असून तो पोलिसांच्या तपासासाठी महत्त्वाचा पुरावा ठरला आहे. घटनेची माहिती मिळताच बंटवाल उपविभागातील वरिष्ठ पोलीस अधिकारी, शहर पोलीस निरीक्षक आणि अन्य अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक अरुण के. यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. आरोपी चेतनला अटक करण्यासाठी विशेष पोलीस पथके तयार करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.