इंडिगोच्या विमानात बॉम्बची धमकी

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
बंगळूरु,
Bomb threat on IndiGo flight कर्नाटकची राजधानी बंगळूरु येथून अहमदाबादकडे जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात बॉम्ब असल्याचा उल्लेख असलेली हस्तलिखित चिठ्ठी सापडल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. उड्डाणापूर्वी विमानाच्या स्वच्छतागृहात ही चिठ्ठी आढळून आल्याने सुरक्षा यंत्रणांनी तातडीने कारवाई करत विमान सुरक्षित ठिकाणी हलवले. मात्र, सखोल तपासणीनंतर कोणतीही स्फोटक सामग्री आढळली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गुरुवारी रात्री घडली. रात्री ८ वाजता बंगळूरुहून अहमदाबादकडे रवाना होणाऱ्या इंडिगोच्या विमानाची स्वच्छता सुरू असताना एका कर्मचाऱ्याला स्वच्छतागृहात ही चिठ्ठी सापडली. त्यामध्ये विमानात बॉम्ब असल्याचा इशारा देण्यात आला होता. यानंतर विमानतळ प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या.
 
 

indigo 
 
धमकीची माहिती मिळताच विमान सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आणि संपूर्ण विमानाची कसून तपासणी करण्यात आली. तपासादरम्यान कोणतीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. ही धमकी खोटी असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली. मात्र, या सर्व प्रक्रियेमुळे विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला आणि प्रवाशांना काही काळ गैरसोयीचा सामना करावा लागला.या प्रकरणी इंडिगोने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, धमकीची चिठ्ठी ठेवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.