कोल्हापूर,
Celebrations in Kolhapur over Argentina's victory फुटबॉलप्रेमासाठी देशभरात वेगळी ओळख असलेल्या कोल्हापूरने पुन्हा एकदा आपली 'सॉकर सिटी' ही ओळख अधोरेखित केली आहे. फिफा विश्वचषक २०२६ च्या उपांत्य फेरीत अर्जेंटिनाने इंग्लंडचा २-१ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश करताच कोल्हापूरमध्ये जल्लोषाला उधाण आले. शहरातील विविध भागांत चाहत्यांनी फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी आणि जल्लोष करत अर्जेंटिनाच्या विजयाचा उत्सव साजरा केला.सामन्यादरम्यान अर्जेंटिना ५५ व्या मिनिटापर्यंत पिछाडीवर होता. मात्र त्यानंतर लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली संघाने दमदार पुनरागमन करत सामना आपल्या बाजूने फिरवला. विजयाची शिट्टी होताच कोल्हापूरमधील फुटबॉलप्रेमींचा आनंद गगनात मावेनासा झाला. आता अंतिम फेरीत स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात होणाऱ्या लढतीची उत्सुकता शहरात शिगेला पोहोचली आहे.

कोल्हापूरमध्ये फुटबॉलप्रेमाची परंपरा अनेक दशकांपासून कायम आहे. शहरातील मिरजकर तिकटी येथे लिओनेल मेस्सीचा, तर बिंदू चौकात ख्रिस्तियानो रोनाल्डोचा तब्बल ४० फूट उंच कटआऊट उभारण्यात आला आहे. नेमारचाही भव्य कटआऊट शहरातील फुटबॉल वातावरणात भर घालत आहे. या आकर्षक सजावटीकडे नागरिक आणि पर्यटकांचे लक्ष वेधले जात आहे.कोल्हापूरच्या फुटबॉलप्रेमाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली आहे. फिफाने सोशल मीडियावर मराठीतून पोस्ट करत कोल्हापूरच्या चाहत्यांच्या उत्साहाचे कौतुक केले. त्यामुळे शहरातील फुटबॉलप्रेमींमध्ये आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापूर आणि फुटबॉलचे नाते शंभर वर्षांहून अधिक जुने आहे. १९१० पासून येथे फुटबॉलची परंपरा सुरू झाली. १९४० मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांच्या पुढाकारातून 'कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन'ची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडमधील निर्वासितांनी येथे युरोपीय फुटबॉल संस्कृती रुजविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. आज शहरात १०० हून अधिक नोंदणीकृत फुटबॉल क्लब आणि हजारो खेळाडू कार्यरत असून, त्यामुळे कोल्हापूरला भारताची 'फुटबॉल पंढरी' म्हणूनही ओळख मिळाली आहे. कुस्ती आणि पारंपरिक कोल्हापुरी संस्कृतीसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराने आता फुटबॉलच्या माध्यमातूनही जागतिक स्तरावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे. अर्जेंटिनाच्या विजयामुळे अंतिम सामन्याची उत्सुकता अधिक वाढली असून, स्पेनविरुद्धच्या विजेतेपदाच्या लढतीकडे आता संपूर्ण कोल्हापूरचे लक्ष लागले आहे.