समुद्रपूर,
compensation-to-farmers : पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशातच काही कंपन्यांच्या सोयाबीन बियाणांची उगवण झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. शासनाने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना संबंधित बियाणे कंपनीकडून एकरी २ लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी या मागणीचे निवेदन सरपंच संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष धर्मेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांना पाठविले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड होते. यावर्षी सोयाबीन पेरणी वेळेवर झाली. परंतु शेतात सोयाबीन उगवलेच नाही. प्रामुख्याने बुस्टर आणि विगोर कंपनीच्या सोयाबीन बियाणांची शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. पण या कंपन्यांचे बियाणे उगवलेच नाही. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
यंदा बँकेचे कर्ज मिळाले नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खाजगी कर्ज काढून, सोने गहाण ठेवून बियाणे व खताची खरेदी केली. तालुका कृषी अधिकाऱ्यांमार्फत शेताची पाहणी करून संबंधित कंपनीकडून शेतकऱ्यांना एकरी २ लाख रुपये मोबदला द्यावा तसेच संबंधित कंपनीवर कायमची बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.