देशातील प्रत्येक व्यक्तीचा जीव मौल्यवान

वांगचुक यांच्या उपोषणावर न्यायालयाकडून चिंता

    दिनांक :17-Jul-2026
Total Views |
नवी दिल्ली,
wangchuks hunger strike देशातील प्रत्येक व्यक्तीचा जीव मौल्यवान आहे़ सरकारने त्यांचे संरक्षण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने सरकारला सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्याचे आणि सरकारी डॉक्टरांकडून दररोज तपासणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. १९ दिवसांपासून उपोषणावर असलेल्या सोनम वांगचुक यांच्या संदर्भात दाखल याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. के. उपाध्याय यांच्या अध्यक्षतेखालील न्यायासनाने ही टिप्पणी केली.
 
 
wangchuks hunger strike
 
सुनावणीदरम्यान, केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करणारे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला आश्वासन दिले की, सोनम वांगचुक यांच्या आरोग्यावर तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून दररोज लक्ष ठेवले जात आहे. डॉक्टरांच्या मतानुसार, त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सरकार आवश्यक ते सर्व करेल.
 
ही याचिका वकील राकेश कुमार सैनी यांनी दाखल केली आहे. १५ जुलैला सुनावणीदरम्यान सैनी यांनी सांगितले की, एक मानवाधिकार कार्यकर्ता आपल्या विराेधाच्या हक्काचा वापर करताना संपूर्ण राष्ट्रासमोर आपल्या प्राणांचे बलिदान देण्यास तयार आहे. न्यायालयाने केंद्र आणि दिल्ली सरकारला सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करून त्यांना खाऊ घालण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी या याचिकेत केली आहे़