वर्धा,
rotha-rape-murder-case : रोठा येथील शेतातील गोठ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. या घटनेतील आरोपी राहुल मडावी याला अटक केली असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी शनिवार, १८ जुलैला सर्वपक्षीय निषेध मोर्चा काढून ‘वर्धा बंद’चे आवाहन केले आहे.
रोठा येथील शेतात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी उद्या, शनिवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज चौक, बजाज चौक मार्गे आंबेडकर पुतळा येथे पोहोचेल. या मोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
- महिला काँग्रेसचे निषेध आंदोलन
या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महिला काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. महिला काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शुक्रवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात घटनेचा निषेध करून संबंधित मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांना दिले. आंदोलनात अर्चना भोमले, रुतूजा भोयर, अर्चना सोमवंशी, संगीता ठवडे, सपना शेंडे, नूतन माळवी, सोनाली कोपुलवार, डॉ. अभ्युदय मेघे, अक्रम पठाण, अविनाश उबाळे, पीयूष कोल्हे, सदिक परवेज, सुनील कोल्हे, धर्मपाल ताकसाडे आदी सहभागी झाले होते.
आरोपीचे वकीलपत्र स्वीकारू नये
रोठा परिसरात १२ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र महाराष्ट्रातील वकिलांनी स्वीकारू नये. शिवाय या प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जनसेवा गोंडवाना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचित सयाम यांनी केली आहे.
आरोपीला मंगळवारपर्यंत पोलिस कोठडी
या प्रकरणातील आरोपी राहुल मडावी याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला मंगळवार, २१ जुलैपर्यंत पोलिस कोठडी ठोठावली. तो पीडितेच्या झोपडीपासून काही अंतरावर असलेल्या एका शेतात काम करीत होता. त्यानंतर त्याने पीडितेची झोपडी गाठली. याच ठिकाणी त्याने पीडितेवर अत्याचार केला नंतर दगडाने मारहाण करून तिचा खून केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे. राहुल मडावी हा पीडित कुटुंबाच्या परिचयातीलच असल्याचे पुढे आले. पीडिताही त्याला ओळखत होती, असे पोलिस तपासात पुढे आले आहे.