वॉशिंग्टन,
Gangster from Jaggu Bhagwanpuria gang अमेरिकेची तपास यंत्रणा एफबीआयने जगू भगवानपुरिया टोळीशी संबंधित आरोपी नितीश कौशल याला अटक केली आहे. अमेरिकेतील व्हरमाँट येथे ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांपूर्वी एफबीआयने नितीश कौशलचा समावेश आपल्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत केला होता. आंतरराष्ट्रीय संघटित गुन्हेगारीविरोधात सुरू असलेल्या 'ऑपरेशन हार्डबॉल' मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.एफबीआयच्या माहितीनुसार, नितीश कौशल हा एका आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी संघटनेचा सक्रिय सदस्य असून त्याच्यावर खून, अमली पदार्थांची तस्करी, खंडणी, अपहरण, शस्त्रास्त्रांची तस्करी, हवाला आणि मानवी तस्करी यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागाचा आरोप आहे. तपास यंत्रणांच्या मते, जगू भगवानपुरिया टोळीचा उगम पंजाबमध्ये झाला असून या टोळीचे जाळे अमेरिकेतील कॅलिफोर्नियासह अनेक देशांपर्यंत विस्तारले आहे.

तपासादरम्यान नितीश कौशलने जगू भगवानपुरिया टोळीच्या वतीने अपहरण, हल्ले आणि इतर हिंसक कारवाया केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. २५ जून रोजी कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्ट फेडरल कोर्टाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. त्याच्यावर रॅकेटियर इन्फ्लुएन्स्ड अँड करप्ट ऑर्गनायझेशन्स कॉन्स्पिरसी ॲक्ट (RICO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एफबीआयने सुरू केलेल्या 'ऑपरेशन हार्डबॉल' अंतर्गत अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधील ५० हून अधिक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित साहित्य आणि अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांनी दिली आहे. या मोहिमेत लॉरेन्स बिश्नोई टोळी, जगू भगवानपुरिया आणि गोल्डी ब्रार यांच्याशी संबंधित नेटवर्कवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या ग्रँड ज्युरीने अमेरिका, मेक्सिको, कॅनडा आणि भारत या देशांमध्ये कार्यरत असलेल्या कथित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्कचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणात जगू भगवानपुरिया आणि त्याच्या अनेक साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून, आरोपपत्रात अवैध शस्त्रास्त्रांची तस्करी, खंडणी, हत्येचा कट आणि अमली पदार्थांची तस्करी यांसारख्या गंभीर आरोपांचा समावेश आहे.