नवी दिल्ली,
heat is robbing everyone क्लायमेट सेंट्रलच्या अहवालानुसार, भारतातील लोकांच्या झोपेवर रात्रीच्या वाढत्या तापमानाचा गंभीर परिणाम होतो आहे. दक्षिण भारत आणि अनेक प्रमुख शहरांना याचा सर्वाधिक फटका बसला आहे. प्रत्येक व्यक्तीची दरवर्षी अनेक तासांची झोप कमी होत आहे.
तज्ञांच्या मते, सततच्या उष्ण रात्रींमुळे शरीराला पुरेशी विश्रांती मिळत नाही. ज्यामुळे हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक ताण आणि इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. दिवसाच्या वाढत्या तापमानासोबतच, रात्रीची उष्णता देखील आरोग्यासाठी एक गंभीर धोका ठरते आहे. क्लायमेट सेंट्रलच्या एका नवीन जागतिक अहवालानुसार, देशाच्या अनेक भागांतील लोकांची उष्ण आणि दमट रात्रींमुळे दरवर्षी अनेक तासांची झोप कमी होत आहे. दक्षिण भारत या समस्येचे केंद्र झाले आहे. हवामान बदल हा आता केवळ हवामानाचा प्रश्न राहिलेला नाही. त्याचा परिणाम लोकांच्या झोपेवर, आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर होतो आहे, असा निष्कर्ष अहवालात काढण्यात आला.
अहवालानुसार, पुदुचेरीमधील लोकांची दरवर्षी सरासरी ९२ तासांची झोप कमी होत आहे. आंध्र प्रदेशात ८८.६ तास आणि केरळमध्ये ८८.३ तासांची झोप कमी झाल्याची नोंद झाली आहे. तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. रात्रीच्या वेळी सतत वाढणाऱ्या उष्णतेमुळे लोकांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. बदलत्या हवामानामुळे तामिळनाडूमध्ये सरासरी व्यक्तीची रात्रीची झोप अंदाजे ७.९ तासांनी आणि कर्नाटकमध्ये ७.८ तासांनी कमी होत आहे. मोठ्या शहरांमध्येही उष्ण रात्रींचा परिणाम झपाट्याने वाढला आहे. या यादीत चेन्नई अग्रस्थानी आहे, जिथे सरासरी व्यक्तीची वार्षिक ९३ तासांची झोप कमी होत आहे. मुंबईत हा आकडा ८४ तास, कोलकातामध्ये ८० तास आणि दिल्लीत ६६ तास आहे.
हवामान बदलामुळे झोपेच्या नुकसानीची सर्वाधिक नोंद बंगळूरुमध्ये झाली आहे, तर हैदराबाद, अहमदाबाद आणि पुणे येथेही लक्षणीय परिणाम दिसून आले आहेत. तज्ञांच्या मते, वेगाने होणारे शहरीकरण आणि काँक्रीटच्या विस्तारामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली आहे.
झोपेच्या कमतरतेमुळे हाेऊ शकतात गंभीर आजार
आरोग्य तज्ञांच्या मते, प्रौढांना दररोज ७ ते ९ तास दर्जेदार झोपेची आवश्यकता असते. जेव्हा रात्रीचे तापमान जास्त राहते, तेव्हा शरीर दिवसाच्या उष्णतेतून सावरू शकत नाही आणि त्याला गाढ झोप लागण्यास अडचण येते. या स्थितीचा दीर्घकाळ टिकल्यास उच्च रक्तदाब, हृदयरोग, पक्षाघात, मधुमेह, लठ्ठपणा, मानसिक ताण, नैराश्य, स्मरणशक्ती कमी होणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होणे यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. पुरेशा झोपेच्या अभावामुळे कार्यक्षमतेवर आणि निर्णयक्षमतेवरही परिणाम होतो.
पाच दशकांत धोका वाढला
या अहवालात भारतासह जगभरातील १,३३८ शहरांचे विश्लेषण करण्यात आले. या अभ्यासानुसार, १९७० च्या दशकाच्या तुलनेत हवामान बदलामुळे झोपेची होणारी घट जवळपास दुप्पट झाली आहे. २०२० ते २०२५ दरम्यान, जगभरातील प्रत्येक व्यक्तीची उष्ण रात्रींमुळे सरासरी ५६ तासांची झोप कमी होईल, आणि यातील १० टक्क्यांहून अधिक घट थेट हवामान बदलाशी संबंधित आहे. शास्त्रज्ञांच्या मते, जीवाश्म इंधनाचा वाढता वापर आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन यामुळे तापमानात सतत वाढ होत आहे. जर उत्सर्जनावर प्रभावीपणे नियंत्रण ठेवले नाही, तर येत्या काही वर्षांत ही समस्या आणखी गंभीर होईल.